इन्शुरन्स पॉलिसी बंद करुन त्या बदल्यात ५८ लाख रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवुन तब्बल २ कोटी २४ लाख रुपये उकळले


इन्शुरन्स पॉलिसी बंद करुन त्या बदल्यात ५८ लाख रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवुन तब्बल २ कोटी २४ लाख रुपये उकळले
पनवेल दि.०३ (वार्ताहर) : इन्शुरन्स पॉलिसी घेणाऱ्या ग्राहकांच्या सुविधेसाठी असलेल्या आयजीएमएसचा प्रतिनिधी असल्याचे भासवून सायबर चोरट्याने कामोठेतील व्यक्तीच्या इन्शुरन्स पॉलिसी बंद करुन त्या बदल्यात ५८. लाख रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवुन त्यासाठी ग्राहकाला वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे पाठविण्यास भाग पाडून त्याच्याकडून तब्बल २ कोटी २४ लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कामोठे पोलिसांनी या प्रकरणी सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.


                    सदर प्रकरणात फसवणूक झालेला विजय (४९) कामोठे भागात कुटुंबासह राहण्यास असून तो एका खाजगी कंपनीत
अकाऊंट विभागामध्ये नोकरीला आहे. विजयने काही वर्षापूर्वी ४ लाख २८ हजार रुपये किंमतीच्या ८ वेगवेगळ्या कंपन्याच्या इन्शुरन्स पॉलिसी काढल्या होत्या. कोरोना काळात विजयला सदर पॉलिसींचे प्रिमीयम भरता आले नाही. त्यामुळे विजयने पॉलिसी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जानेवारी २०२० मध्ये विजयने इन्शुरन्स पॉलिसी घेणाऱ्या ग्राहकांच्या सुविधेसाठी असलेल्या आयजीएमएसच्या वेबसाईटवर आपल्या पॉलिसी बंद करण्यासाठी फॉर्म भरला होता. त्यात विजयने आपली संपूर्ण माहिती भरली होती. त्यानंतर सायबर चोरट्याने याच वेबसाईट वरील माहिती घेऊन आयजीएमएसचा प्रतिनिधी दिपक बन्सल असल्याचे भासवून विजयला संपर्क साधला. तसेच त्याच्या पॉलिसीमध्ये ४ लाख २८ हजार रुपये जमा असल्याचे तसेच त्याच्यावर त्याला ६ लाखांचा बोनस मिळणार असल्याचे सांगून विजयला सदरच्या पॉलिसी बंद न करण्याचा सल्ला दिला.
 त्यानंतर ठकसेन दिपक बन्सल याने विजयला पॉलिसीवर मिळणाऱ्या ६ लाख रुपयांमध्ये तो स्वतः ४ लाख रुपये भरुन एकूण १० लाख रुपयांची रक्कम प्रॉपर्टी गॅरंटी फंड मध्ये गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. त्यातून विजयला सहा महिन्यात ५८ लाख रुपये मिळणार असल्याचे आमिष दाखविले. सदर भामट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून विजयने आपली सर्व माहिती ई-मेलद्वारे दिपक बन्सल याला पाठवून दिली. त्यानंतर दिपक बन्सल याने फाईल तयार असल्याचे सांगून विजयला फाईलची प्रोसेसींग फिचे ६८ हजार रुपये पाठविण्यास सांगितले. ५८ लाख रुपये मिळतील या आशेने विजयने दिपक बन्सल याला रक्कम पाठवून दिली. त्यानंतर दिपक बन्सल याने ऑगस्ट २०२० ते आतापर्यंत विजयला वारंवार संपर्क साधून त्याच्या पॉलिसीच्या अनुषंगाने त्याच्याकडे प्रोसेसींग फी, पैसे ट्रान्सफर फी, टॅक्स आणि इतर वेगवेगळी कारणे सांगून विजयला पैसे पाठविण्यास भाग पाडले. अशा पध्दतीने दिपक बन्सल याने गत ३ वर्षाच्या कालावधीत विजयकडून तब्बल २ कोटी २४ लाख रुपये उकळले. मात्र, अद्यापपर्यंत विजयला कुठल्याही प्रकारचा परतावा मिळाला नाही. त्यानंतर त्याने गत आठवडयात कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.


थोडे नवीन जरा जुने