पनवेल दि.०९ (वार्ताहर) : मौजे घोट येथील शेतकऱ्यांच्या आजोबांनी विकत घेतलेल्या जमिनीचा गैर पद्धतीने तब्बल ५८ वर्षांनंतर व्यवहार केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी जागेची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या मोजणीला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला. सदर प्रकरणात मूळ मालकाचे वारसदार आणि नव्याने खरेदी करणारे देखील याठिकाणी आले होते. तसेच तळोजा पोलीस ठाण्याच्यावतीने काही अघटीत घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सन १९६५ साली घोट येथील शेती ही पनवेलमधील खतीजाबिबी दाऊदसाहेब पटेल यांच्याकडून चांग्या विठू पाटील यांनी खरेदीखत करून विकत घेतली. मात्र अज्ञानपणामुळे त्यांनी सदर जमिनीचे सात बारा उतारे बनविले नाहीत. आणि ५८ वर्षे त्यांच्यासह त्यांचे उत्तराधिकारी हे जमिनीत शेती करीत राहिले. याप्रकरणी पटेल यांच्या नातवाला या जागेचा सात बारा आपल्याच नावाने असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने त्याचा फायदा उचलून सद्यस्थितीत येथील जागांचे वाढते भाव लक्षात घेता परस्पर तिसऱ्यालाच विकण्याचा प्रताप केला. तर सदरची जागा ही विकत घेणार हे वर्षानुवर्षे कसत असल्याची कागदपत्रे बनविली आणि सातबाऱ्यावर नावे देखील चढवून घेतली. ही बाब बळीराम पाटील आणि कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत सरकारी दप्तरे झिजविण्यास सुरुवात केली. यावेळी सदर जागा आपली आहे यापलीकडे त्यांच्याकडे कोणताच पुरावा शिल्लक नव्हता. त्यामुळे सर्वच ठिकाणी त्यांना निराशा पदरी पडली. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांनी घराची झाडलोट सुरू केल्यानंतर १९६५ साली आजोबांनी खरेदी केलेल्या या जागेचा पुरावा म्हणून खरेदीखत हाती लागले.
याबाबत मा. पनवेल न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दाद मागण्यात आली असून सदर प्रकरण न्याय प्रविष्ट असतानाही जागा मोजणी करण्याचा घाट येथील अधिकाऱ्यांना हाताशी धरून मूळ जमीन मालक यांचे नातू यांनी केला असल्याचा आरोप शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत जागा मोजणी अधिकाऱ्यांनी जागेच्या मोजणीबाबत नोटीस ३ ऑगस्ट रोजी काढल्या मात्र त्या नोटीस शेतकऱ्यांपर्यंत किंवा चतुर्भुज असलेल्या शेतकऱ्यांपैकी एकालाही मिळाली नाही. यावरून घोट गावातील लगतचे शेतकरी आणि ग्रामस्थ या मोजणीला विरोध करण्यासाठी एकवटले. अखेर जागा मोजणी अधिकाऱ्यांनी नोटीस न मिळाल्याच्या कारणावरून मोजणीला विरोध असल्याचा पंचनामा तयार करून त्यावर ग्रामस्थांच्या सह्या घेवून पुढील मोजणीची तारीख १० दिवसात ठरविली जाईल असे सांगितले. प्रत्यक्षात सदर जमिनीचा दुसऱ्यांदा व्यवहार होत असल्यामुळे मूळ मालकाच्या नातवाने कायदेशीर गुन्हा केला असल्याचे शेतकरी दिलीप पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना बोलताना सांगितले. याप्रकरणी आगरी कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील याठिकाणी उपस्थित होते. त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत सांगितले की, कसेल त्याची जमीन हा कुळ कायदा बाबासाहेबांनी अमलात आणला तोच मुळात शेतकऱ्यांच्या हितासाठी. आज शेतकऱ्याने याठिकाणी ती जमीन कसली सुद्धा आहे आणि पैसे देवून विकत सुद्धा घेतली आहे.
जुन्या लोकांच्या अज्ञानपणामुळे त्यांना कायदेशीर बाबी माहीत नव्हत्या. रजिस्ट्रार कार्यालयातील नोंद म्हणजे सर्व काही आहे, अशी समज असल्यामुळे त्यांनी याबाबींकडे लक्ष दिले नाही. अनेक वर्षे उलटली. त्यांची तिसरी पिढी सुद्धा आता याठिकाणी भातशेतीचे काम करीत आहे. आणि अशावेळी या शेतकऱ्यांना त्रास देणे उचित नाही. त्यामुळे आपण या शेतकऱ्यांसह चतूर्सिमा असलेले शेतकरी मोजणीला विरोध करीत आहेत, याचा उल्लेख आपल्या रिपोर्टमध्ये करावा अशी विनंती त्यांनी केली. त्यानुसार जागा मोजणी अधिकाऱ्यांनी मोजणीला विरोध होत आहे याचा उल्लेख केला , मोजणी करण्यासाठी कायमस्वरूपी विरोध दर्शविला. अधिकाऱ्यांनी देखील नोटीस न मिळाल्याचे कारण देत विरोध असा भाषेचा खेळ करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली असल्याचा आरोप समाजाचे नेते राजाराम पाटील यांनी केला आहे. यावेळी मोजणी अधिकारी आणि पोलीस अधिकारी सदर जमीन ताब्यात घेण्यासाठी आलेले पाहून तिथले आसपासचे शेतकरी जमा झाले. यावेळी या शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही जमीन बळीराम मंगल पाटील आणि त्यांच्या भाव बंदकीची असून आज पर्यन्त तेच याठिकाणी जमीन कसत आले आहेत, असे ग्रामस्थांसह लगतच्या शेतकरी बांधवांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
Tags
पनवेल