पनवेल(प्रतिनिधी) रंगमंचावर एकटा असूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा कलाकार हा ताकदीचा मानला जातो. एकपात्री किंवा द्विपात्री नाट्य सादर करताना कलाकाराचा अभिनय लक्षवेधी असावा लागतो. अशाच कलाकारांच्या अभिनयाची कसोटी पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धेची अंतिम फेरी रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणार आहे.
सकाळी ९ वाजता या स्पर्धेचे उदघाटन तर बक्षिस वितरण सायंकाळी ०५ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे असणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सुप्रसिद्ध सिने नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर,
भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे यांची तर विशेष सन्माननीय अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अजिंक्य ननावरे, चला हवा येऊ द्या फेम संदीप रेडकर, विनोदी अभिनेता अंकित म्हात्रे यांची उपस्थिती असणार आहे.
आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेलच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या नाट्यस्पर्धांचे आयोजन केले जाते. ‘रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा’ असे ब्रीद घेत अटल करंडक एकांकिका स्पर्धा, मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धा, एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि कलाकारांच्या अविष्काराला दाद दिली जाते. या स्पर्धा राज्यस्तरीय पातळीवर होतात. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांतून वेगवेगळ्या नाट्य संस्था यात सहभागी होतात. त्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या या एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धेचे यंदाचे हे चौथे वर्ष असून नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Tags
पनवेल