यारा फर्टीलाइजर्स इंडियामध्ये बांगलादेशी कामगार; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचा दावा








यारा फर्टीलाइजर्स इंडियामध्ये बांगलादेशी कामगार; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचा दावा
पनवेल दि.१३(वार्ताहर): उरण तालुक्यातील दिघोडे येथील रानसई धरण मार्गालगत असणाऱ्या यारा फर्टीलाइजर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये बांगलादेशी कामगार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर कडू यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे. तसेच येथील कंपनीमध्ये जी खताची पावडर येते त्या पावडरचे उघड्यावर केमिकलमध्ये रूपांतर होऊन याठिकाणी असणाऱ्या नाल्यातून ते केमिकल मिश्रित पाणी नदीमध्ये जावून मासेमारी व्यवसाय देखील अडचणीत आला असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.


      याबाबत सविस्तर बोलताना त्यांनी सांगितले की, यारा फर्टीलाइजर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू करीत असताना स्थानिक कामगार भरती करण्याची बोली झाली होती. मात्र कंपनी व्यवस्थापक गोविंद सारस्वत यांनी स्थानिकांची कामगार भारती न करता बांगलादेशी कामगार ठेवले असल्याचे आढळून आले असल्यामुळे स्थानिकांची फसवणूक झाली आहे. यावर व्यवस्थापनाला जाब विचारला असता पोलिसांना हाताशी धरून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न देखील केला. 





तसेच याठिकाणी येणारी खताची पावडर ही उन्हामध्ये १५ मिनिटे राहिली तर ती विरघळून तिचे केमिकलमध्ये रूपांतर होते आणि बाजूलाच असलेल्या नाल्यामधून ती थेट नदीत जात असल्यामुळे परिसरातील आदिवासी कुटुंबांचा मासेमारी व्यवसाय देखील धोक्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रायगड जिल्ह्याच्यावतीने निवेदन देखील देण्यात आले आहे. सदर निवेदन हे उरणचे तहसीलदार, जिल्हाधिकारी अलिबाग, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, पोलीस आयुक्त नवी मुंबई आणि मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आले आहे. यावेळी मधुकर कडू यांनी



 प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनाची दखल घेवून स्थानिक कामगारांना न्याय मिळवून देत परप्रांतीय बांगलादेशी कामगार ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती केली आहे
.


थोडे नवीन जरा जुने