ब्लॉक दरम्यान अतिरिक्त बस सेवा प्रदान करण्याची परिवहन मंत्र्यांना विनंती
नजीकच्या काळामध्ये पनवेल रेल्वे स्थानकाचे रुपडे बदलणार आहे. सध्या ए दर्जा प्राप्त असलेल्या या रेल्वेस्थानकामध्ये अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकार घेत आहेत. येत्या लॉंग वीकेंडला याच प्रकल्पातील काही महत्त्वाची कामे करण्याचे रेल्वे प्रशासनाने योजले आहे. म्हणूनच शनिवारी रात्री अकरा वाजल्यापासून सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल ते बेलापूर वाहतूक संपूर्ण पणे बंद असणार आहे.
डायरेक्ट फ्रीट कॉरिडोर, पनवेल कर्जत उपनगरीय सेवा, फलाट क्रमांक आठ ते बाराची उभारणी अशी तीन महत्त्वाकांक्षी आणि पनवेल स्थानकाचे कायापालट करणारी कामे सध्या रेल्वे स्थानकामध्ये सुरू आहेत. याव्यतिरिक्त सुरू असलेल्या रेल्वे मार्गांची देखभाल व दुरुस्ती करणे देखील तितकेच आवश्यक असते. येत्या सोमवारी गांधी जयंतीची सुट्टी असल्याने मोठा विकेंड आला आहे. नुकताच गणेशोत्सव संपन्न झालेला असल्यामुळे दरम्यानच्या काळात वाहतुकीवरती ताण कमी असणार आहे. त्यामुळेच मेगा ब्लॉक घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर ची मोठी कामे पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सेंट्रल रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनचे वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक बी अरुण कुमार यांनी परिवहन मंत्रालयाला पत्र लिहून पनवेल ते बेलापूर रेल्वे मार्ग बंद असल्यामुळे बेलापूर पासून पुढे पनवेल पर्यंत ये जा करण्यासाठी राज्य परिवहन सेवा,बी ई एस टी, एन एम एम टी अशा विविध परिवहन सेवांची अतिरिक्त बस सेवा सुरू करण्याबाबत पत्र दिले आहे.
Tags
पनवेल