प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून बालविवाह, मानवी तस्करी सारख्या घटना रोखण्याचा प्रयत्न करावा.प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून
बालविवाह, मानवी तस्करी सारख्या घटना रोखण्याचा प्रयत्न करावा.
                                                                             डॉ.गणेश व. मुळे 

नवी मुंबई, दि.11 : समाजातील प्रत्येक नागरिकांने आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या बालविवाह , मानवी तस्करी सारख्या घटनांबाबत सतर्क राहून अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांनी केले. 
 आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त, देशभरात सुरु असलेल्या ‘बालविवाह मुक्त भारत’ मोहिमेच्या अनुषंगाने महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट पेण आणि सोहम फाऊंडेशन,पनवेल यांच्यावतीने भुवन रिभू यांनी लिहिलेल्या “व्हेन चिल्ड्रन हॅव चिल्ड्रन टिपिंग पॉईंट टू एन्ड चिल्ड्रन मॅरेज” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त ते बोलत होते.यावेळी पेणच्या महाराष्ट्र सामजिक विकास ट्रस्टचे संस्थापक मनोज गांवड, विभागीय माहिती कार्यालयाच्या सहाय्यक संचालक संजीवनी जाधव-पाटील, उपसंपादक प्रविण डोंगरदिवे, पत्रकार राजेश प्रधान, तसेच विभागीय माहिती कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. 
डॉ.गणेश मुळे म्हणाले की, महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट हे प्रामुख्याने कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्हयात ‘बालविवाह मुक्त भारत’ या अभियानासाठी काम करत आहेत. या ट्रस्टच्या माध्यामातून ग्रामीणभागात या अभियानाची जनजागृती व्हावी. बालविवाह आणि मानवी तस्करी सारख्या घटनांना आळा बसावा. यासाठी ही संस्था काम करीत आहे. बालविवाह ही प्रथा 2030 पर्यंत भारतातून हद्दपार करावयाची आहे. यासाठी शासनासह विविध सामाजिक संस्था कार्यरत आहेत. हे अभियान यशस्वी करण्याकरीता प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून आपल्या सभोवताली घडणाऱ्या अशा घटनांबाबत प्रतिसाद देणे आवश्यक आहे.
भुवन रिभू एक प्रसिध्द बाल हक्क कार्यकर्ते तसेच महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी लढणारे सर्वोच्च न्यायालयाचे प्रखर वकील असून महिला आणि मुलांसाठी काम करणाऱ्या एनजीओचे सल्लागार देखील आहेत. बालविवाहामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या 300 हून अधिक जिल्हयांमध्ये नागरीसमाज आणि महिलांच्या नेतृत्वाखालील ‘बालविवाह मुक्त भारत’ मोहिमेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हे पुस्तक एक सर्वांगिण वैचारिक आधार, फ्रेमवर्क आणि कृती आराखडा प्रदान करते. या मोहिमेचे उद्दिष्ट 2030 पर्यंत बालविवाह पूर्णपणे काढून टाकणे आणि अशा प्रकारे दरवर्षी 15 लाख मुलींना बालविवाहापासून वाचविणे असा आहे. देशातील मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विद्यमान सरकारी धोरणे आणि कायद्यांच्या अंमलबजावणीवर या मोहिमा विशेषत: लक्ष केंद्रित करतात.
यावेळी महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्टचे संस्थापक मनोज गावंड म्हणाले की, देशभरातील 288 जिल्हयांमध्ये कार्यरत 160 संस्थांसह एनजीओ स्थानिक आणि तळागाळात बालविवाह बंद करण्यासाठी कार्यरत असून, या सर्व संस्था 16 ऑक्टोंबर,2023 रोजी ‘बालविवाह मुक्त भारत’ दिनाच्या तयारीत व्यस्त आहेत. या दिवशी देशातील हजारो गावांमध्ये बालविवाह विरुध्द जनजागृती कार्यक्रम, पथनाट्य, बालविवाह विरोधात प्रतिज्ञा, कार्यशाळा, मशाल मिरवणूका आणि इतर अनेक उपक्रमांद्वारे बालविवाह कोणत्याही परिस्थितीत बंद झाला पाहिजे असा संदेश दिला जाणार आहे.


                                                                       
थोडे नवीन जरा जुने