शनिवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वा. नवीन शेवा येथे माजी सरपंच कै.जे. पी. म्हात्रे यांच्या शोक सभेचे आयोजन.






उरण दि २९(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील सुपरिचित व्यक्तिमत्व असलेले नवीन शेवा गावचे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते, माजी सरपंच व शिवसेना तालुका संपर्क प्रमुख जे. पी. म्हात्रे यांचे शुक्रवार दिनांक २२/९/२०२३ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने उरण तालुका शिवसेनेत शोककळा पसरली आहे. आजाराने त्यांना त्रस्त केले होते. शेवटी शरीराने साथ न दिल्याने अखेर त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांच्या जाण्याने शिवसेना उरण तालुक्याला एक तडाखेबाज, निर्भीड कार्यकर्ता गमावल्याचे शल्य नेहमी राहणार आहे.जे.पी. म्हात्रे ( जनार्दन पांडुरंग म्हात्रे ) हे शिवसेना शाखा नवीन शेवा शाखेचे संस्थापक होते. ते १९९२ ते २०१७ पर्यंत सतत २५ वर्षे नवीन शेवा ग्रामपंचायतीमध्ये राहीले. 




त्यामध्ये ते २० वर्षे सरपंच व महिला आरक्षण आल्यामुळे ते ५ वर्षे सदस्य राहिले. गावाची संपूर्ण कमान त्यांच्या हाती होती. १८ गाव जे.एन.पी.टी. प्रकल्पग्रस्त बाधित सरपंच कमिटीचे ते अध्यक्ष ही होते. सध्या ते शिवसेना उरण तालुका संपर्क प्रमुख पदी कार्यरत होते.गावातील बेरोजगारांना काम मिळविण्यासाठी त्यांनी श्री शांतेश्वरी प्रकल्पग्रस्त मजूर सह. सोसायटीची स्थापना करून शेकडो पुरूष-महिलांना सोसायटी मध्ये काम दिले. तसेच जे.एन्.पी.टी. परिसरांत अनेक कंपन्यांमध्येही गावातील बेरोजगार तरूणांना रोजगार उपलब्ध करून दिला.शिक्षण कमी असून देखील त्यांची वक्तृत्वावर छाप होती. त्यांचे बोलणे निर्भीड होते तसेच त्यांना वाचनाची आवड होती. कुठल्याही व्यवस्थापनाबरोबर बोलणी करताना मुद्देसूरपणे आपले म्हणणे मांडण्यात तरबेज होते. त्यांनी गावासाठी अनेक उपोषणे, आंदोलने केली आहेत. मग त्यामध्ये जे.एन्.पी.टी प्रशासन, कोकण आयुक्त, कलेक्टर ऑफिस, तहसिल कार्यालय अशा प्रशासनांना नमविण्याची ताकद जे. पी. म्हात्रेंमध्ये होती. आणि त्यामध्ये त्यांना यश ही आले. तसेच तालुक्यात होणारे निदर्शने, मोर्चे, आंदोलन, उपोषणात नेहमी अग्रेसर असायचे. जे. पी. म्हात्रे हे गावातील विविध संस्थांचे सल्लागार म्हणूनही काम पहायचे त्यामध्ये ग्रामसुधारणा मंडळ, नवरात्रौत्सव मंडळ, श्री शांतेश्वरी देवी सार्वजनिक वाचनालय, स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय, तसेच शांतेश्वरी प्रकल्पग्रस्त मजूर सहकारी सोसायटीचे चेअरमनही होते. 




शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे ते जवळचे सहकारी होते. 
जेंव्हा राजकीय, सामाजिक प्रश्न उद्भवायचे त्यावेळी रोखठोक, तिथल्या तिथं त्या प्रश्नांना उत्तरं देण्यात जे. पी. म्हात्रे यांचा हातखंड होता. तसेच कोणत्याही निवडणूका असोत त्यामध्ये हिरीरीने भाग घेवून पक्षासाठी नेहमी मेहनत करणारा निष्ठावंत कार्यकर्ता होता. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तसेच शिवसेना शाखेनेही दुखवटा पाळला आहे.शनिवार दि. ३०/९/२०२३ रोजी सायंकाळी ठिक ५ वाजता शिवसेना शाखा, नवीन शेवा येथे शोकसभेचे आयोजन माजी आमदार मनोहरशेठ भोईर व शिवसेना शाखा नवीन शेवा यांनी केले आहे. तसेच उत्तर कार्य मंगळवार दि. ३/१०/२०२३ रोजी नवीन शेवा येथे आहे.अशी माहिती के. एम्. घरत अध्यक्ष तंटामुक्त समिती नवीन शेवा तथा शिवसेना उपतालुका संघटक यांनी दिली आहे.


थोडे नवीन जरा जुने