उरण दि ३१(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यात २००५ साली कंत्राटी ग्रामसेवक म्हणून भरती झालेले वैभव बाळकृष्ण पाटील या ग्रामसेवकाने त्यांच्या १८ वर्षाच्या नोकरीच्या काळात उरण तालुक्यातील वशेणी, पागोटे, घारापुरी, केगांव, चाणजे, बांधपाडा या ग्रामपंचायतीमध्ये पैशाचा मोठा अपहार केला असुन त्यांच्या वैयक्तीक बँक खात्यावर करोडोंच्या ठेवी जमा केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठरण तालुका अध्यक्ष सत्यवान भगत यांनी केला असुन सदर ग्रामसेकाची सखोल चौकशी करून त्याला सेवेतून बडतर्फ करण्याची लेखी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातुन केली आहे.
उरण तालुक्यात ज्या ग्रामपंचायतीवर काम केले आहे त्या ग्रामपंचायतीच्या तिजोऱ्या या ग्रामसेवकाने बिनधास्त खाली करून अपहार केलेला पैसा तो आपल्या बँक खात्यात जमा करीत आहे. आपल्या पगाराच्या खात्यावर करोडो रूपये जमा केल्याचा धक्कादायक प्रताप उरण तालुक्यात काम कलेल्या वैभव बाळकृष्ण पाटील या ग्रामसेवकाने केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्या बेहिशोबी मालमत्तेची सखोल चौकशी करण्याची मागणी मनसेचे उरण तालुकाध्यक्ष सत्यावान भगत यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात सत्यवान भगत यांनी नमूद केले आहे की, उरण मध्ये २००५ या वर्षी वैभव बाळकृष्ण पाटील हे कंत्राटी ग्रामसेवक म्हणून ३००० रुपयांच्या मानधनावर रुजू झाले. त्यानंतर त्याच्या पगारामध्ये वाढ होऊन त्याचा सन २०२३ साली पगार ३०८४० इतका झाला. मात्र त्याच्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील उरण येथील असणाऱ्या पगाराच्या खात्यावर ऑगस्ट २०२३ मध्ये १,५२,१५,३७७.०३/- (एक कोटी बावन्न लाख पंधरा हजार तीनशे सत्याहत्तर रूपये तीन पैसे) इतक्या रक्कमेचा व्यवहार झाल्याचे दिसून येत आहे.
वास्तविक या खात्यावर ग्रामसेवक वैभव बाळकृष्ण पाटील याच्या आतापर्यतच्या पगाराची ३००००००/- इतकी रक्कम जमा होणे अपेक्षित आहे. मात्र ग्रामसेवक वैभव बाळकृष्ण पाटील यांना कमी शासकीय पगार असताना कोटयावधीची बेहिशोबी रक्कमेची उलाढाल करणे आश्चर्य असल्याचे मनसे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी नमूद केले आहे.
सदर ग्रामपंचायतीमध्ये काम केलेल्या कंत्राटदार व पुरवठादारांकडून मोठ मोठया रकमा वैभव बाळकृष्ण पाटील यांच्या खात्यावर आल्याचे दिसून येत आहे. उरण तालुक्यातील ग्रामपंचायत घारापुरी, वशेणी, पागोटे, गाव, चाणजे, व बांधपाडा या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक वैभव बाळकृष्ण पाटील याच्या कारकिर्दीमधील व्यवहारांची तपासणी केल्यास त्याच्या आर. डी. डी. सी. बँकेच्या (खाते क्रमांक १५१९३ ) खात्याची सखोल तपासणी केल्यास साईराज इंटरप्रायझेस, सिध्दी मॅनेजमेंट सर्व्हिसेस, स्वराज ट्रेडर्स व इतर दुकानदारांकडून चेकाद्वारे आर.टी.जी.एस. द्वारे, एन ई एफ टी द्वारे, कॅश द्वारे मोठमोठ्या रक्कमा घेतल्याचे दिसून येईल असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी पत्रात नमूद केलेले आहे
. व अशा प्रकारच्या खाती उरण व पेण तालुक्यातील अनेक राष्ट्रीयकृत बँकेत असुन भ्रष्टाचाराच्या पैशातून वैभव बाळकृष्ण पाटील या ग्रामसेवकाने पनवेल व पेण येथे फ्लॅट खरेदी करून अनेक महागडे मोबाईल व इतर इलेक्ट्रानिक वस्तुंची खरेदी केली आहे. हा ग्रामसेवक उरण तालुक्यात त्याच्या मनमानी, उध्दट्ट व गैरव्यवहारी कारभारामुळे निलंबित झाला असुन सध्या तो खालापुर येथील नंदनपाडा या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहे. मात्र त्याने उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये केलेला भ्रष्टाचार ही गंभीर बाब असुन त्याची सखोल चौकशी करून त्याला सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी मनसे उरण तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त व मुख्यकार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे केल्याने शासकीय विभागात खळबळ निर्माण झाली आहे.
Tags
उरण