अल्पसंख्यांक समाज काँग्रेसच्या कायम सोबत असल्यामुळे काँग्रेसची ताकद कधीच कमी होणार नाही







अल्पसंख्यांक समाज काँग्रेसच्या कायम सोबत असल्यामुळे काँग्रेसची ताकद कधीच कमी होणार नाही

काँग्रेस अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा यांचा विश्वास

भिवंडीत होणाऱ्या बुनकर संमेलनाच्या नियोजनाची पनवेलमध्ये बैठक संपन्न

पनवेल: 
          काँग्रेस हा सर्वधर्मियांना सोबत पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे. अल्पसंख्यांक समाज हा काँग्रेसचा गाभा आहे. पूर्वीप्रमाणे आताही अल्पसंख्यांक समाज काँग्रेसच्या कायम सोबत असल्यामुळे काँग्रेसची ताकद कधीच कमी होणार नाही. या धर्तीवर अल्पसंख्यांक, मागासवर्गीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागातर्फे शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर रोजी भिवंडी येथे अल्पसंख्यांक आणि बुनकर संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा वक्फ बोर्डचे महाराष्ट्र चेअरमन (राज्यमंत्री दर्जा) आमदार वजाहत मिर्झा यांनी दिली. 




             ते आज (मंगळवार दि.३ ऑक्टोबर) काँग्रेस भवन पनवेल येथे आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सज्ज झाली आहे. या अनुषंगाने रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी व पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने पनवेल काँग्रेस भवन येथे भिवंडी येथे होणाऱ्या बुनकर संमेलनाच्या नियोजनाची बैठक आमदार वजाहत मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, नौफील सय्यद, अखलाख शिलोत्री, लतिफ शेख, अनंत पाटील, शशिकला सिंह, निर्मला म्हात्रे, हेमराज म्हात्रे, नंदराज मुंगाजी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 



            एकीकडे पंतप्रधान रेडिओवरून 'मन की बात' करतात तर राहुल गांधी साडेतीन हजार किलोमीटर पदयात्रा काढून जनतेच्या समस्या जाणून घेतात, हा फरक आहे. देशाला आता काँग्रेस शिवाय पर्याय नाही. बुनकर संमेलनामध्ये बुनकर समाजाच्या समस्यांसाठी अखिल भारतीय अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इमरान प्रतापगढी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडे्टीवार आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. बुनकर समाजाच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी हे सगळे एकत्र येणार असल्याची माहितीही आमदार वजाहत मिर्झा यांनी यावेळी दिली. 



             रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत म्हणाले, रायगड हा बॅरिस्टर अंतुलेंचा जिल्हा आहे. त्यांनी रायगडचाच नवे तर राज्याचा कायापालट केला. रायगड आणि मावळ मतदारसंघात काँग्रेसने मोठी ताकद निर्माण केली आहे. कर्नाटकच्या जनतेने मोदी सरकारला हटवले. हेच चित्र महाराष्ट्रात दिसणार आहे. २०२४ ला चारही राज्यात काँग्रेसची ताकद दिसेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आज काँग्रेसच्या सभांना होणारी गर्दी हेच मोठे यश आहे. आपण सारे राहुल गांधी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहूया, २०२४ ला काँग्रेस सत्तेत येईल हा ठाम विश्वास आहे. 




 
थोडे नवीन जरा जुने