पनवेल दि.३०(संजय कदम): पनवेल महानगपालिकेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पनवेल शहर पोलिसांनी स्थापन केलेल्या गणेशाचे विसर्जन न करता सदर गणेश मूर्ती दान केल्याने एक आगळा वेगळा संदेश पनवेलकरांना त्यांच्या मार्फत गेला आहे.
पनवेल महापालिकेच्या गणेश मूर्ती दान आवाहनानंतर पनवेल शहर पोलीसांनी पोलीस ठाण्यातील गणेशमूर्ती अनंत चतुर्दशीच्या दूसऱ्या दिवशी पालिकेला दान करुन पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे हे उपस्थित होते. पनवेल महापालिकेने मूर्ती दान करणाऱ्या कुटूंबियांना ‘पर्यावरण दूत’ या पदवीने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. त्यामूळे मूर्तीदानाच्या या भूमिकेमुळे पनवेल शहर पोलीस यापूढे ‘पर्यावरण दूत’ म्हणून ओळखले जाणार आहेत.
पनवेल महापालिका प्रशासनाने यंदा जास्तीत जास्त गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. नैसर्गिक तलावांमधील जलप्रदूषण रोखून पर्यावरण रक्षण करण्यासाठी हा उपक्रम पालिकेने हाती घेतला होता. अनंत चतुर्दशीपर्यंत ३२१ गणेशमूर्ती पालिकेकडे गणेशभक्तांनी दान करुन पर्यावरण रक्षणाप्रती त्यांची जागरुकता दाखवून दिली. नागरिकांप्रमाणे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे यांनी सुद्धा गणेश मूर्ती दानाचा संकल्प करुन पोलीस विभागात नवा पायंडा पाडला. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या आवारात गणेशोत्सव साजरा करण्याची अनेक वर्षांची परंपरा होती. या गणेशोत्सवातील गणेशमूर्ती विसर्जनापूर्वी वाजतगाजत मिरवणूक काढणे त्यानंतर तलावामध्ये विसर्जन करणे ही सुद्धा परंपरा होती
. मात्र गणेशमूर्ती दान करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कर्मचारी वर्गासह सहाय्यक पोलीस आयुक्त राजपूत, वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे आणि पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी सुद्धा गणेशमूर्ती मिरवणूकीत ताल धरल्याचे पाहायला मिळाले. महापालिकेच्या आवाहनाला सरकारी कार्यालयांपैकी पोलीस विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. अत्यंत भक्तिमय वातावरणात या गणेशाला पोलीस बांधवानी निरोप दिला.
Tags
पनवेल