पनवेल महानगरपालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या शाळांचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण करा - ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे आदेश





पनवेल : दि.१८ डिसेंबर (4K News) पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांचे हस्तांतर पनवेल महानगरपालिकेकडे करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी नागपूर येथे संबंधित अधिकाऱ्यांना दिले.  




       पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांचे हस्तांतर पनवेल महानगरपालिकेकडे विनामोबदला करण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदन देऊन बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने नागूपर येथे विधानभवनात हि बैठक नामदार गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, विभागाचे प्रधान सचिव, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, उपायुक्त गणेश शेट्ये यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. 


        पनवेल महानगरपालिका हद्दीत रायगड जिल्हा परिषदेच्या ५१ शाळा असून या सर्व शाळेमध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील हजारो गरिब व गरजू विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रायगड जिल्हा परिषदेमार्फत या शाळांची दुरूस्ती देखील गेल्या अनेक वर्षापासून करण्यात आलेली नसल्यामुळे शाळेच्या इमारती सद्यस्थितीत खूपच धोकादायक व नादुरूस्त अवस्थेत आहेत. तसेच सर्व शाळांची मालकी रायगड जिल्हा परिषदेकडे असल्यामुळे पनवेल महानगरपालिका या शाळांची दुरूस्ती तांत्रिक दृष्ट्या करू शकत नाही. शिक्षण घेणे हा मुलभुत अधिकार असल्यामुळे सदर शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या भविष्याचा विचार करता हया शाळांमध्ये उत्तम दर्जाचे शिक्षण व त्यांना लागणाऱ्या सुविधा पुरविणे अत्यंत गरजेचे असून नादुरूस्त शाळा पनवेल महानगरपालिकेकडे विनामोबदला हस्तांतर केल्यास महानगपालिकेमार्फत सदर शाळांची दुरूस्ती किंवा नवीन वांधकाम करून उत्कृष्ट दर्जाच्या शाळा उभारून रायगड जिल्हयातील गोर व गरिब विद्यार्थ्यांना शाळेचा लाभ घेणे शक्य होणार आहे, त्यामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांचे हस्तांतर पनवेल महानगरपालिकेकडे विनामोबदला करण्यात यावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या निवेदनातून केली होती.  




           या संदर्भात झालेल्या बैठकीतील चर्चेत ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पनवेल महानगरपालिका हद्दीत येणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या निर्णयामुळे शाळांना नवसंजीवनी मिळण्याबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षण सुलभ आणि गुणवत्ता विकासाला चालना मिळणार आहे. 




थोडे नवीन जरा जुने