पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पनवेलमध्ये शास्त्रीय संगीत महोत्सव




पनवेल: दि. 6 डिसेंबर (4K News): ऋषितुल्य गायक संगीतभूषण पंडित राम मराठे यांचा जन्मशताब्दी वर्ष राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा होत आह


त्या अनुषंगाने संगीत भूषण पं. राम मराठे फाऊंडेशन, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व नादब्रम्ह साधना मंडळ खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १७ डिसेंबर रोजी पनवेलमध्ये 'शास्त्रीय संगीत महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. 
या महोत्सवाची सुरुवात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून होणार आहे. 
         संगीतभूषण पं. राम मराठे हे नाव उच्चारताच संगीताचे साधक, गायक, संगीत रंगभूमीवरील कलावंत, शास्त्रीय संगीताचे विद्यार्थी, जाणकार आणि जिज्ञासू श्रोते या सर्वांच्या मनात एक मोठा संगीतपट क्षणार्धात सजीव होतो. 




जयपूर, आग्रा आणि ग्वाल्हेर या तिन्ही घराण्यांच्या गायकीवर प्रचंड हुकुमत असलेले पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला २३ ऑक्टोबर २०२३पासून सुरुवात झाली आहे. पंडित राम मराठे हे केवळ हिंदुस्थानी शास्त्रीय गायकच नव्हते तर ते नाट्य आणि चित्रपट अभिनेतेही होते. त्यांनी लहानपणापासूनच मराठी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे मिराशी बुवा आणि त्यानंतर आग्रा येथील जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या आई मोगुबाई कुर्डीकर यांच्याकडून ते जयपूर घराण्याचे बारकावे शिकले. कुमार गंधर्व आणि सी. आर. व्यासांप्रमाणेच मराठे यांनीही आपल्या गुरूंपेक्षा वेगळी अशी स्वतःची शैली विकसित केली. त्यांनी आपल्या नवनिर्मितीत सर्व घराण्यांतून शिकलेली गायकी आणि त्यातील बारकाव्यांचा पाया ठेवला. त्यामुळे त्यांच्या गायकीचे वेगळेपण ठळकपणे दिसून येते. मास्टर कृष्णराव यांच्याकडून राम मराठे शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीताचे बारकावे शिकले. सौभद्र, एकच प्याला, मानापमान, संशय कल्लोळ, स्वयंवर अशा सुपरहिट संगीत नाटकांतील त्यांची कामगिरी आजही अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या स्मरणात आहे. 




व्ही. शांताराम यांच्या प्रभात फिल्म कंपनीशी ते स्थापनेपासून जोडले गेले होते. मात्र, काही वर्षांतच कंपनी सोडून ते मुंबईला आले. येथे त्यांनी शास्त्रीय गायन आणि रंगभूमीवरील अभिनयावर लक्ष केंद्रित केले. बाल गंधर्वांसारख्या बुजुर्ग आणि श्रेष्ठ कलाकारासोबत अभिनय करण्याचे भाग्य पंडित मराठे यांना लाभले. रागांचा आणि बंदिशींचा प्रचंड खजिना त्यांच्याकडे होता, स्वतःच्या दमदार गायकीतून, सृजनशील आविष्कारातून त्यांनी रसिकांच्या मनात घर केले. त्यामुळे त्यांचा संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारानेही गौरव झाला आहे. साडेसात हजारांच्या आसपास नाट्यप्रयोग, साडेतीन हजारांहून अधिक मैफिली करणाऱ्या आणि गाण्यावर अद्भुत प्रेम असलेल्या या कलावंताला आदरांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन पनवेल मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात करण्यात आले आहे. 


       
थोडे नवीन जरा जुने