कुडाळच्या ढिंग टँग ढिटँग एकांकिकेने पटकाविला राज्यस्तरीय अटल करंडक गौरव रंगभूमी पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांचा सन्मान




पनवेल : दि.१२ डिसेंबर (4K News)श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत कुडाळच्या ढ मंडळी टीमची ’ढिंग टँग ढिटँग’ ही एकांकिका विजेती ठरली. 





त्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृह नेते व अटल करंडक स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच या स्पर्धेच्या अनुषंगाने महत्वपूर्ण अशा यंदाच्या गौरव रंगभूमी पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांना सन्मानित करण्यात आले.



पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे पारितोषिक वितरण रविवारी झाले. या सोहळ्यास परीक्षक, अभिनेते लेखक व दिग्दर्शक संजय मोने, सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर, लेखक व दिग्दर्शक राजन ताम्हाणे, अभिनेता भरत सावले, स्पर्धेचा बँ्रड अँबेसिडर प्रसिद्ध अभिनेता अजिंक्य ननावरे, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत, उद्योजक विलास कोठारी, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, सिने व नाट्यनिर्मात्या कल्पना कोठारी, माजी महापौर कविता चौतमोल, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुमित झुंझारराव, नाट्य परिषद पनवेल शाखा प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, सहकार्यवाह स्मिता गांधी, कोषाध्यक्ष अमोल खेर, भाजप सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, समन्वयक गणेश जगताप, चिन्मय समेळ, ओंकार सोष्टे, केदार भगत, प्रीतम म्हात्रे, किरण पाटील, अभिषेक भोपी, अक्षय सिंग आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भाजप सांस्कृतिक सेलचे पनवेल शहराध्यक्ष वैभव बुवा यांनी केले




या राज्यस्तरीय स्पर्धेत एकाहून एक सरस अशा एकांकिका सादर होत असल्याने बहुमानाचा अटल करंडक यंदा कोण पटकावणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती. परीक्षकांचा निकाल येई पर्यंत अनेकांच्या मनात धाकधूक होती. अखेर रात्री पावणे दहाच्या सुमारास रंगमंचावर अटल करंडक आला आणि नयनरम्य फटाक्यांच्या आतषबाजीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजेत्या एकांकिकेचे नाव जाहीर केले. यावेळी विजेत्या कुडाळच्या ढ मंडळी टीमने एकच जल्लोष करीत रंगमंचावर धाव घेतली.
या सोहळ्याचे प्रास्ताविक करताना स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यश हे कलारसिक आणि स्पर्धक यांच्यामुळे असून राज्यातील सांस्कृतिक चळवळीत पनवेलचेही योगदान असावे यासाठी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येत असल्याचे अधोरेखित केले.   





थोडे नवीन जरा जुने