पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः भाजपा महासचिव, महाराष्ट्र. व मा.उपमहापौर पनवेल विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या जनसेवा कार्यालया समोर छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला.
नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविणारे युवा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव सोहळा 2024 भाजपा महासचिव महाराष्ट्र व मा.उपमहापौर श्री विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या जनसेवा कार्यालया समोर 19 फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यंदाचे 2024 हे वर्ष शिवराज्याभिषेक सोहळ्याचे 350 वे वर्ष असल्याने यावर्षी शिवराज्याभिषेक मिरवणूक सोहळ्याचा सुंदर असा चलचित्र देखावा साकारण्यात आला होता.
याच बरोबर किल्ले रायगडावरून आणलेली शिवज्योत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर आणि सुबक अशी मूर्ती पनवेलकरांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली होती.सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस आलेल्या जेष्ठ नागरिक आणि विक्रांत पाटील यांच्या सर्वांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला
.त्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळा मिरवणुक चलचित्र देखाव्याचा उदघाटन करण्यात आले.सकाळपासून पनवेलकरांनी चलचित्र देखावा पाहण्यास व छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेण्यास गर्दी केली होती.रात्री तलवारबाजी मध्ये राष्ट्रीय पदक विजेती कु.दिव्या पाटील हिने तलवारबाजीचे प्रात्यक्षिक दाखवून कार्यक्रमास आलेल्या सर्व नागरिकांची मनं जिंकली व शाबासकी मिळवली.छत्रपती शिवाजी महाराज यांना श्री शिव सह्याद्री ढोल ताशा पथक पनवेलच्या वतीने मानवंदना देण्यात आली व त्यानंतर मनमोहक आतिषबाजीने आलेल्या सर्व नागरिकांची मनं जिंकली.आलेल्या सर्व नागरिकांना गजानन भास्कर मेहेंदळे लिखित छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर.... हे भेट रुपी पुस्तक श्री विक्रांत पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी मा.कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील आणि युवा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
पनवेल