पनवेल दि. ०८ (संजय कदम) : 'गांजा' हा अंमली पदार्थ विकी करण्याच्या उद्देशाने स्वतःचे कब्जात बेकायदेशिररित्या बाळगणाऱ्या दोन आरोपींना अंमली पदार्थ विरोधी कक्षाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पनवेल तालुक्यातील शेडंग कडुन पळस्पे कडे जाणारे रोडवर आजिवली गाव जवळ दोन इसम गांजा या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळाली होती. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वपोनि निरज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश धुमाळ, पोउपनिरी कुलदिप मोरे, पोना अंकुश म्हात्रे आदींच्या पथकाने सापळा रचून आरोपी निलेश देशमुख (वय-३५) आणि अर्जुन देवकर (वय २५) यांना 'गांजा' हा अंमली पदार्थ विकी करण्याच्या उद्देशाने स्वतःचे कब्जात बेकायदेशिररित्या बाळगल्या बद्दल ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पथकाने ६ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा आणि ३४ किलो ४०० ग्रॅम वजनाचा गांजा, १० लाख रुपये किंमतीची पांढ-या रंगाची मारुती इर्टीगा गाडी तर ३५ हजार रुपये किमतीचे दोन फोन असा एकूण १७ लाख २३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ऍक्ट कलम ८ (क), २० (ब),२० (ब) (II),२९ या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
पनवेल