विकास कामांच्या जोरावरती यावेळी ची निवडणूक सुद्धा मीच जिंकणार - खासदार श्रीरंग बारणे

पनवेल दि.०८ (वार्ताहर): गेली दहा वर्ष मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये केलेल्या विकासकामांमुळे मतदार यंदाच्या निवडणुकीत सुद्धा माझ्या पाठीशी ठाम उभे राहतील व हि निवडणूक मोठ्या फरकाने जिंकूच असा ठाम विश्वास मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
          आगामी लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजू लागले असून मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मावळ लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार मीच असणार असल्याचा दावा केला.

 यावेळी गेल्या १० वर्षांमध्ये खासदार म्हणून श्रीरंग बारणे यांनी केलेल्या कामांबाबत पत्रकारांसमोर आपल्या कामांचा लेखाजोगा मांडला. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, महानगरप्रमुख अॅडव्होकेट प्रथमेश सोमण, उपमहानगर प्रमुख महेश सावंत, महानगर संघटक मंगेश रानवडे, तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, खारघर शहर प्रमुख प्रसाद परब, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, उपजिल्हा क्षणालयात ३३ बेडची व्यवस्था होती, त्यानंतर कोरोना काळात आपण ५० बेड अधिक मंजूर करून घेतले. आज रोजी १३० बेडची व्यवस्था या रुग्णालयात करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील साडेतीन लाख लोकांसाठी हे उपजिल्हा रुग्णालय उपयोगी पडले. पनवेल ते जेएनपीटी येथे जाणारा रस्ता अवजड वाहतुकीने खोळंबला जात होता, येथे मोठा रस्ता तयार करण्यात आला, 


आणि हे काम आमच्या कार्यकाळात पार पडले आहे. सिडकोच्या माध्यमातून बांधलेल्या रेल्वे स्थानकात प्रवाशांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करून सिडकोच्या माध्यमातून ते पूर्ण करून घेतले. नैना प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. त्याच प्रमाणे पासपोर्ट कार्यालयासाठी सुद्धा शासनाकडे पाठपुरावा करणार असून पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कराबाबत देखील सवलत देण्यासाठी राज्य सरकार अनुकूल असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील घडामोडींवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना श्रीरंग बारणे यांनी सांगितले, शिवसेनेचे १३ खासदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली आहे. आमच्या जागा या आम्हालाच मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, तसेच राज्यातील ज्या घडामोडी जनतेसमोर येत आहेत यामध्ये काहीतरी संभ्रम निर्माण केला जात असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. विमानतळाला दिबांचे नाव अद्यापही दिले गेले नसल्यामुळे नेमके कारण काय ? असा प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी विमानतळाबाचत दि.बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा विरोधात नाहीत, आम्ही स्वतः दिबांच्या नावासाठी लोकसभेत विषय घेतला होता. राज्य सरकार त्यादृष्टीने सकारात्मक असून तसा पाठपुरावा देखील आम्ही करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.आगामी निवडणुकीत महायुतीचा उमेदवार म्हणून मीच निवडणूक लढवणार आहे.माझ्या समोर उमेदवार कोण आहे हे अर्ज दाखल केल्यावरच आपल्याला समजेल असे त्यांनी यावेळी सांगितले.


थोडे नवीन जरा जुने