मावळ : ५ मे (4k News) वंचित बहुजन आघाडीच्या मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार सौ. माधवीताई जोशी यांना निवडणूक अधिकाऱ्यांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. माधवी ताई जोशी यांनी आपला निवडणूकीतील दैनंदिन खर्च निवडणूक अधिकाऱ्यांकडे तपासणीकरीता सादर केला असताना त्यात तफावत आढळून आली आहे. त्या खर्चाच्या तफावतीबाबत मावळ लोकसभा निवडणुक अधिकारी दीपक सिंगला यांनी त्यांना नोटीस दिली आहे.
या नोटीसमध्ये नमूद केले आहे की, ३३-मावळ लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुक, २०२४ च्या अनुषंगाने आपन किंवा अपल्या नियुक्त प्रतिनिधीने निश्चित केलेल्या दिवशी निवडणुक खर्चाची नोंदवही व प्रमाणके तपासणीसाठी सादर करणे आवश्यक होती. त्यानुसार दिनांक ०३ रोजी आपल्या मार्फत उमेदवाराचा निवडणूक खर्च, निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे तपासणीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला होता. या खर्चाची तपासणी केली असता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने नोंदविलेल्या शॅडो रजिस्टरसोबत तुलना करता खरा व योग्य वाटत नाही,
अथवा खर्चाचा काही भाग समाविष्ठ करण्यात आलेला नाही असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच निदर्शनास आलेली तफावत़ीची रक्कम देखील नोटीसमध्ये नमूद केली गेली आहे.
या अमान्य तफावतीबाबत सदरची नोटीस प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या आत आपला खुलासा सादर करावा व पुढील दुसऱ्या तपासणीच्या वेळी सदर निवडणूक खर्चाचे लेखे ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष येथे न चुकता सादर करावेत. विहीत मुदतीत आपले म्हणणे प्राप्त न झाल्यास नोटीसमधील नमुद खर्च आपणांस मान्य आहे असे गृहीत धरुन आपल्या निवडणुक खर्चामध्ये समाविष्ट करण्यात येईल. नोटीसमध्ये नमुद तफावत आपल्याला मान्य असल्यास सदर खर्चाचा समावेश आपल्या खर्च नोंदवहीत करण्यात यावा व तसे सूचित करण्यात यावे,
Tags
मावळ