इन्फोसिस फाऊंडेशन व भारतीय विद्या भवनतर्फे सांस्कृतिक सप्ताहामध्ये शास्त्रीय संगीतापासून लोकनृत्यांचा अनोखा नजराणा न्यूज ब्युरो - नवी मुंबई



दिनांक ७ जून ते १३ जून या कालावधीत होणाऱ्या "इन्फोसिस फाउंडेशन व भारतीय विद्या भवन कल्चरल आउटरीच प्रोग्राम" या सांस्कृतिक कार्यक्रमाची घोषणा नुकतीच करण्यात आली. नवी मुंबईतील वाशी सेक्टर-30 येथे असलेल्या भारतीय विद्या भवनच्या सभागृहात हा प्रोग्रॅम संध्याकाळी 6:30 ते 8:30 या वेळेत आठवडाभर साजरा होणार आहे. कल्चरल आउटरीच कार्यक्रम हा समृद्ध भारतीय सांस्कृतिक वारसा साजरा करण्यासाठी आणि विविध भागातील नृत्यकला, नाट्यकला, भजन, गोंधळ, लावणी आणि इतर राज्यातील प्रसीद्ध मात्र आता मागे पडलेल्या कलाविष्कारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अत्यंत नियोजनबद्धतेने आयोजित करण्यात आला आहे. उपस्थितांना शास्त्रीय संगीत, नृत्य, लोककला आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचे प्रदर्शन यानिमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. 


Infosys Foundation ही परोपकारी संस्था शिक्षण, आरोग्यसेवा, संस्कृती आणि ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित करून, भारताच्या सामाजिक विकासात योगदान देणाऱ्या प्रकल्पांना समर्थन देण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेऊन काम करते. तर भारतीय विद्या भवन ही एक प्रतिष्ठित संस्था शिक्षण आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी समर्पित आहे. 

या ७ दिवसांच्या कार्यक्रमात पहिल्या दिवशी शुक्रवार दिनांक ७ जून रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन तसेच अभंग, ढोल ताशा पथकाचे सादरीकरण संपन्न होईल. यावेळी उद्घाटन नृत्य GVRNK फाउंडेशनचे विद्यार्थी पारंपारिक भरतनाट्यम नृत्य पद्धतीने करणार आहेत. तर या सोबतच प्रसिद्ध हिंदुस्थानी गायक आणि सी. आर. व्यास यांचे शिष्य पंडित संजीव चिम्मलगी हे पारंपरिक महाराष्ट्रीय भक्तिगीते सादर करतील.
दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक ८ जून रोजी गुरुबाबाजी औसेकर महाराज आणि ग्रुपचे चक्री भजन पार पडेल. टाळ, पखवाज आणि मृदंगम यांसारख्या वाद्यांसह भक्तीगीतांचा अनुभव प्रेक्षकांना घेता येईल. 

तिसऱ्या दिवशी रविवार दिनांक ९ जून रोजी भूषण कोरगावकर अँड कंपनीचे लावणी परफॉर्मन्स संपन्न होतील. लेखक, अनुवादक आणि नाट्यनिर्माते भूषण कोरगावकर हे त्यांच्या कलाकारांसोबत महाराष्ट्रातील पारंपरिक लावणी व नाट्यनिर्मिती असलेली संगीत बारी सादर करणार आहेत.

चौथ्या दिवशी सोमवार दिनांक १० जून रोजी दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते चिंतन सतीश यांचा गरबा परफॉर्मन्स पार पडणार आहे. तसेच गोव्यातील पारंपरिक समई नृत्य ज्यामध्ये नर्तकांच्या डोक्यावर पितळेचे दिवे लावून नृत्य केले जाते, ते पाहण्याची अनोखी मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. या सोबतच महाराष्ट्रातील वारकरी श्रद्धेचे केंद्रस्थान विठोबाच्या सन्मानार्थ नृत्य सादर होणार आहे. तसेच या दिवशी महाराष्ट्रातील देवी-देवतांच्या पौराणिक गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोंधळ नृत्याचेही सादरीकरण होणार आहे. 


पाचव्या दिवशी मंगळवार दिनांक ११ जून रोजी प्रसिद्ध कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांचे पुत्र चारुदत्त आफळे हे आपल्या कुटुंबाचा समृद्ध वारसा पुढे नेत पारंपारिक कीर्तन सादर करतील. 

सहाव्या दिवशी बुधवार दिनांक १२ जून रोजी बिकानेर, राजस्थान येथील लोक गायक, मुख्तियार अली हे त्यांच्या सुफी गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील.  

सातव्या सापरोपच्या दिवशी गुरुवार दिनांक १३ जून रोजी सप्तक लोकनृत्य समूहातर्फे काठियावाड नृत्य केले जाणार आहे. गुजरातमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त हा नृत्य गट असून सप्तक काठियावाडमधील पारंपारिक नृत्य सादर करणार आहे.

थोडे नवीन जरा जुने