पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाची विशेष बैठक संपन्न


         पत्रकार उत्कर्षासाठी झटणारी आणि सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असणारी पत्रकारांची नोंदणीकृत संस्था म्हणजे पनवेल पत्रकार विकास मंच. सोमवार दिनांक १० जून रोजी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाची विशेष बैठक संपन्न झाली. अध्यक्ष विवेक मोरेश्वर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या विशेष बैठकीच्या सुरुवातीला पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


           पनवेलच्या जडणघडणीमध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे साप्ताहिक श्रीविद्या चे संस्थापक संपादक केशव विनायक केळकर आणि त्यांचे चिरंजीव शशिधर केळकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना मंचाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे सन्माननीय सदस्य तथा सल्लागार अविनाश कोळी यांना सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात आमंत्रण प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनचा ठराव पारित करण्यात आला.