लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर 'लोकमत लोकनेता' पुरस्काराने सन्मानित


पनवेल (प्रतिनिधी) राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व देत जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करणारे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांना 'लोकमत लोकनेता' सन्मान पुरस्काराने मुंबईत गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मनसे नेते माजी आमदार नांदगावकर, नितीन सरदेसाई, लोकमत मिडिया ग्रुपचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, उपाध्यक्ष विजय शुक्ला, संपादक अतुल कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते.   
     
        महाराष्ट्रातील सर्वात मोठा विधानसभा मतदार संघ म्हणून पनवेल मतदार संघ गणला जातो. या मतदार संघाचे २००९ सालापासून सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून संपृर्ण जबाबदारीने आमदार प्रशांत ठाकूर कार्यरत आहेत. कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दूरदृष्टीतून पनवेल विधानसभा क्षेत्रात विकासाचे महापर्व आले. प्रगती पासून दूर आणि भकास झालेल्या पनवेलला विकासाचा चेहरा देण्याचे काम त्यांनी केले, त्यामुळे आपल्या कार्यकौशल्यातून पनवेलचा विकास घडविणारे, वक्तृत्व, दातृत्त्व आणि नेतृत्त्व गुणसंपन्न नेता व समाजप्रिय व्यक्तीमत्व म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांचा पनवेलकरांना नेहमीच अभिमान राहिला आहे. नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करतानाच लोकांना अपेक्षित असलेला शहरासह ग्रामीण भागाचा विकास त्यांच्याकडून झाला आहे. 
         आमदार निधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना, जिल्हा वार्षिक नियोजन, २५१५ मुलभुत विकास सुविधा, आदिवासी विकास योजना अशा विविध विकासकामांच्या योजनेतून त्यांनी पनवेलचा विकास घडविला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय, प्रशासकीय भवन, मुंबई- पनवेलचे प्रवेशद्वार असलेले उड्डाणपूल, भुयारी गटार योजना, रस्त्यांचा विकास, नगरपरिषेदचे पनवेल महानगरपालिकेत निर्माण आणि त्या माध्यमातून महानगरपालिका हद्दीत विकास, पनवेल न्यायालय इमारतीसाठी शासनाकडून निधी, पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांमध्ये विस्तार, प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी

 सातत्यपूर्ण पाठपुरावा, अमृत योजना, सामाजिक सभागृह, विसर्जन घाट, अंगणवाडी, स्मशानभूमी, गटारे, शाळा दुरुस्ती, पुले, संरक्षक भिंत, हायमास्ट, नळ पाणी पुरवठा योजना अशा अनेक विकासकामांचा झंझावात करतानाच शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. त्याचबरोबर श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबीर, जयपूर फूट, खारघर मॅरेथॉन, कला, क्रीडा, नाट्य, व सांस्कृतिक महोत्सव, शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत अशी अनेक उपक्रमे गेल्या ३० वर्षांपासून सुरु असून आमदार प्रशांत ठाकूर यांचे कार्य प्रेरणादायी ठरले आहे. त्यामुळे अनेक सन्मान बहुमान त्यांना प्राप्त झाले आहे. त्यातच लोकमतच्यावतीने त्यांना 'लोकनेता' हा सन्मान प्रदान करण्यात आला असून त्या निमित्ताने पनवेलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 
            हा सन्मान प्रदान करत असताना यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांना दिलेल्या मानपत्रात म्हंटले आहे कि,, समाजकारण आणि राजकारण यांची योग्य सांगड घालत आपण महामुंबईच्या प्रगतीमध्ये मोलाची भूमिका बजावत आहात. संवेदनशीलता, कठोर परिश्रम, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपण करत असलेली जनसेवा ही नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. आपल्या कार्याला मिळालेली लोकमान्यता ही आपण लोकनेता' असल्याचे अधोरेखित करते. आपल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल लोकमत समूहातर्फे आपणांस मानपत्र देऊन सन्मानित करताना अत्यानंद होत असल्याचे अधोरेखित करण्यात आले. 

थोडे नवीन जरा जुने