पनवेल (प्रतिनिधी) कळंबोली सेक्टर १४ येथे गेल्या काही महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू होता. जुनाट आणि कमी क्षमतेची केबल त्याचबरोबर वाढलेला लोड यामुळे ही समस्या उद्भवली होती. याबाबत स्वतः आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष घातल्यामुळे या परिसरामध्ये नव्याने वीज वाहिनी टाकून पिलर सुद्धा बसवण्यात आला आहे. परिणामी आता हजारो वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा केला जाणार आहे. येथील रहिवाशांनी यामुळे समाधान व्यक्त केले आहे.
कळंबोली सेक्टर १४ येथे बी यु डीपी ची घरे आहेत. या ठिकाणी अल्प आणि मध्यमवर्गीय लोक वास्तव्यास आहेत. दरम्यान नियमित वीज बिल भरणा केला जात असतानाही या ठिकाणचा वीज पुरवठा सातत्याने खंडित होत होता. केबल फॉल्ट होणे, त्याचबरोबर स्पार्क आणि ट्रांसफार्मामध्ये बिघाड या कारणाने रात्रीच्या वेळी तासंतास बत्ती गुल होत होती. त्यातच नवरात्र सुरू असून पहिल्या आणि तिसऱ्या माळीला पूर्णपणे अंधार झाला होता. परिणामी भाविकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. या परिसरात अखंडीत वीज पुरवठा व्हावा यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बैठक सुद्धा घेतली होती.
यासंदर्भात त्वरित उपाययोजना करण्यात यावे असे सूचित केले होते. सेक्टर १४ येथील वीज प्रश्नावर कळंबोली शहराध्यक्ष रवीनाथ पाटील यांनी महावितरण कंपनीला पत्र दिले होते. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी सुद्धा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. दरम्यान या संदर्भात कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि कळंबोलीचे सहाय्यक अभियंता यांनी स्वतः गांभीर्याने लक्ष घालून सेक्टर १४ येथील वीज वाहिनी बदलली आहे.
अगोदर या ठिकाणी ७० के व्ही ची केबल होती. एकूण विजेची मागणी पाहता त्याची क्षमता कमी असल्याने हा प्रश्न निर्माण होत असल्याचे सहाय्यक अभियंत्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून ३०० के व्ही क्षमतेची वीज वाहिनी या ठिकाणी नव्याने टाकली. जवळपास दीडशे मीटर लांबीची केबल बदलण्यात आली. या कामाची राजेंद्र शर्मा यांनी स्वतः स्थळ पाहणी केली. आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वीज वितरण कंपनीने या ठिकाणी उपाययोजना केल्या. आता या भागातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा होईल असा विश्वास महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.