मुस्लिम बांधवांच्या सर्वांगीण विकासाकरता आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा निवडून देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे आवाहन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष,अल्पसंख्यांक मोर्चा सय्यद अकबर यांनी केले. आमदार प्रशांत ठाकूर यांचा घरोघरी जाऊन प्रचार करत असताना त्यांनी उपरोक्त वक्तव्य केले. मुस्लिम बांधवांच्या घरोघरी जात सय्यद अकबर हे प्रचार करत आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचंड प्रमाणामध्ये मुस्लिम बांधवांची मते मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्या मार्गदर्शनानुसार सय्यद अकबर व त्यांचे तमाम कार्यकर्ते मुस्लिम बांधवांच्या घरोघरी जात आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार करत आहेत. नुकताच सय्यद अकबर यांनी पनवेल येथील पटेल मोहल्यातील भारत नगर येथे प्रचार दौरा केला. मुस्लिम बांधवांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना मत का दिले पाहिजे?
याचे विश्लेषण सय्यद अकबर व त्यांचे सहकारी घरोघरी जाऊन करत आहेत. माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे मशीद, कब्रस्तान, मदरसे याकरता जेव्हा सहकार्य मागितले तेव्हा तेव्हा अपेक्षेपेक्षा जास्त मदत या दोघांच्या कडून झालेली आहे. तसेच त्यांनी मुस्लिम समाजातील मुलांना शिक्षणाकरता भरघोस अर्थसहाय्य केलेले आहे. मुस्लिम समाजातील गरीब व गरजू लोकांना विनामूल्य वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे.
त्यांच्यामुळेच पनवेलमध्ये अल्पसंख्यांक समाजातील मुलींकरता वस्तीगृह निर्माण झालेले आहे. त्याचा फायदा हजारो अल्पसंख्यांक समाजातील मुलींना होत आहे.त्यांचे हे कार्य आम्ही घरोघरी जाऊन सांगत आहोत असे सय्यद अकबर म्हणाले.
भारत नगर मधील रहिवाशांना आवाहन करताना सय्यद अकबर म्हणाले की आज तुमच्यापुढील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पंतप्रधान आवास योजनेतून हक्काची घरे प्राप्त करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीमागे उभे राहावे लागेल. मला केवळ विश्वासच नाही तर ठाम खात्री आहे की तुमचे अमूल्य मत तुमच्यासाठी विकास,उत्कर्ष आणि उज्वल भविष्य घेऊन येईल.
या प्रचार दौऱ्यामध्ये सय्यद अकबर यांच्या समवेत नाविद पटेल, मस्तफा पटेल,मेहराज शेख आधी पदाधिकाऱ्यांसमवेत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
पनवेल