आपसातील मतभेद बाजूला सारुन एकत्रित कामाला लागा विजय आपला नक्की आहे मनोहर भोईर



पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः आपसातील मतभेद बाजूला सारुन सर्वांनी एकत्रित काम केल्यास उरण मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचा विजय निश्‍चित असल्याचे प्रतिपादन आज 190 उरण विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) च्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) च्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी कोटनाका येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीला महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर, धिरज डाकी, 

 दिपीका भंडारकर, सचिन केणी, विरेंद्र जाधव, समाधान म्हात्रे, भूषण म्हात्रे, मनोज भगत, मंगेश कोळी, किशोर ठाकूर, शिवसेनेचे पंडित अवधेश शुक्ला, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, उलवे शहरप्रमुख बाळू म्हात्रे, जाहिद मुल्ला, केवल माळी यांच्यासह अनेक पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी बोलताना उमेदवार मनोहर भोईर यांनी विरोधकांचे वाभाडे काढताना सांगितले की, यांच्याकडे जमा झालेला पैसा कुठल्या मार्गाने आला आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे. जेएनपीटी माध्यमातून करण्यात येणारी विकासकामे ही आपणच केल्याचे ते सांगत आहेत. यातूनच त्यांचा खोटेपणा समोर येत आहे. अशा व्यक्तीचा माज उतरविणे गरजेचे आहे. यासाठी सर्व समाजाने एकत्रित येवून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. या भाजपच्या उमेदवाराला कायमचे घरी बसविण्यासाठी प्रितम म्हात्रे यांनी पाठींबा द्यावा असे आवाहन मनोहर भोईर यांनी केले.

 तर भावना घाणेकर यांनी सुद्धा आपल्या घणाघाती भाषणामध्ये भाजपचे उमेदवार महेश बालदी यांचा चांगलाच समाचार घेत कार्यकर्त्यांनी आता पेटून उठले पाहिजे व कायमचे या उमेदवाराला घरी बसविले पाहिजे. उरणचा विकास करण्याऐवजी उरणची दुर्दशा करण्याचे महापाप या चुकून झालेल्या आमदाराने केले असून प्रत्येक ठिकाणी दादागिरी करून हा धमकाविण्याचे प्रकार करत आहे. परंतु आता त्याच्या या धमक्यांना उरणवासिय घाबरणार नसून त्याला सडेतोड उत्तर येत्या 20 तारखेला मतदानाच्या रुपाने देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अनेक मान्यवरांनी भाषणे करून महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असल्याचे जाहीर केले. याप्रसंगी मनोहर भोईर यांनी एकाच दिवशी काँग्रेस पक्षाचे नेते महेंद्र घरत व राष्ट्रवादी काँग्रेसच्या भावना घाणेकर यांनी पाठींबा दिल्याबद्दल त्यांनी जाहीर आभार मानले.


थोडे नवीन जरा जुने