करंजाडेत वाहनांच्या वेगाला ब्रेक लागणार; करंजाडेतील सर्व रस्त्यांवर गतिरोधक बसवले


पनवेल दि. ०८ (वार्ताहर) : आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्यामुळे व सरपंच मंगेश शेलार यांच्या पुढाकाराने करंजाड्यातील सर्व रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र रस्ते चकाचक झाल्यामुळे भरधाव वाहनांची संख्याही वाढली. त्यामुळे अपघात घडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाहनांच्या वेगाला ब्रेक लागणे आवश्यक होते. या अनुषंगाने नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच मंगेश शेलार यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून करंजाडेतील सर्व रस्त्यांवर गतिरोधक बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली. याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आमदार महेश बालदी व सरपंच मंगेश शेलार यांचे आभार मानले आहेत.
              करंजाडेमध्ये खड्ड्यांची समस्या जटिल झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना खड्डेमय रस्त्यांतून वाट काढताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत होती. गेल्यावर्षी भाजपचे सरपंच मंगेश शेलार यांनी करंजाडे ग्रामपंचायतीची सूत्रे हाती घेताच रस्त्यांच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा सुरूच ठेवला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि करंजाडे सेक्टर १ ते ६ मधील सर्व रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली व रस्त्यांची कामेही पूर्ण झाली. 

          मात्र करंजाडेतील रस्ते सुसाट झाल्यामुळे वाहनांवरील वेगाचे नियंत्रणही सुटले. त्यामुळे वाहनांच्या वेग मर्यादेला लगाम लगावा यासाठी सरपंच मंगेश शेलार यांच्या पाठपुरावा कामी आला. सिडकोकडून करंजाडे वसाहतीचे प्रवेशद्वार, सेक्टर ३ टाटा पॉवर समोर, सनराइज हॉस्पिटल समोर, सेक्टर ५ पोलीस चौकी समोरील मुख्य रस्त्यावर, सेक्टर ५ रिक्षा स्टॅन्ड, सेक्टर ६ यासह करंजाडेतील सर्व चौक व मुख्य रस्त्यांवर शुक्रवारी गतिरोधक बसवण्यात आले आहेत. याप्रसंगी गतिरोधक बसवण्याच्या कामाची पाहणी करताना करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार, भाजपचे विभागीय अध्यक्ष कर्णाशेठ शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, विभागीय उपाध्यक्ष नाथाभाई भारवड, ग्रामपंचायत सदस्य सुरेश शेलार, करंजाडे शहर महिला अध्यक्षा सुषमा मयेकर, विक्रम मोरे, अजय साबळे, रवि राजपूत, प्रशांत म्हात्रे यांच्यासह करंजाडेतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : करंजाडेतील सर्व रस्त्यांवर गतिरोधक बसवले
थोडे नवीन जरा जुने