एसटी बसमधून फुकट प्रवास करण्याऱ्या तोतया कर्मचाऱ्यास अटक


पनवेल दि.०२ (वार्ताहर) : एसटी महामंडळाचे सातारा विभागातील कर्मचाऱ्याचे बनावट ओळखपत्र तयार करून त्याद्वारे एसटी बसमधून फुकट प्रवास करणाऱ्या एका ठकसेनाला एटी महामंडळाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी पकडले आहे. संतोष बाळु जाधव (३५) असे या ठकसेनाचे नाव असून सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याला पनवेल तालुका पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात बनावटगिरी करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

आरोपी संतोष जाधव हा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात शटफळ हवेली येथे राहण्यास असून २८ ऑगस्टला तो ठाणे-अलिबाग या एसटी बसमधून प्रवास करून जात होता. ही बस पनवेल-पेण मार्गावरील खारपाडा टोल नाक्यावर आली असताना, एसटी महामंडळाच्या पेण विभागीय कार्यालयातील सुरक्षा व दक्षता अधिकारी शिवनाथ पाखरे, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक गोविंद गारळे, वाहतूक नियंत्रक रामचंद्र भोसले या तिघांनी सदर बस थांबवून त्यातील प्रवाशांच्या तिकीट तपासणीला सुरुवात केली. यावेळी आरोपी संतोष जाधव याने त्याच्या जवळ असलेले सचिन जाधव या नावाचे एसटी महामंडळाचे सातारा विभागाचे शासकीय ओळखपत्र दाखविले. मात्र सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दुसऱ्या पुराव्याबाबत विचारणा केली असता, त्याने त्याच्याकडील पगार स्लिपची छायांकीत प्रत दाखविली. परंतु सदर स्लीप ही पुण्यातील इंदापूर आगाराची असल्याने सुरक्षा अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी त्याला उलटसुलट प्रश्न विचारणा केल्यानंतर तो घाबरुन गेला. त्यानंतर त्याने सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हातातील ओळखपत्र घेऊन एसटी बसमधून पलायन केले. यावेळी सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून पकडल्यानंतर त्याने सदरचे ओळखपत्र चुलत भाऊ सचिन जाधव याचे असल्याचे तसेच ते बनावट पद्धतीने तयार केल्याचे कबूल केले. त्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी सचिन जाधव याला संपर्क साधून त्याच्याकडे देखील बनावट ओळखपत्राबाबत खातरजमा केली असता, त्याने त्याचे ओळखपत्र त्याच्याजवळ असल्याचे सांगितले. त्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी आरोपी संतोष जाधवला पनवेल तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले.

थोडे नवीन जरा जुने