जामीनावर सुटून पुन्हा केली चोरी; सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात




पनवेल दि.०८ (वार्ताहर) : जामीनावर सुटून पुन्हा चोरी करणाऱ्या आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी चोरी केलेल्या 5 तोळे सोने व 5 हजार रुपये असा एकूण 2 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मंदिरातील दानपेटी चोरीचा तपास करत असताना चोरटा पळून जाताना त्याच्या चिखलात उमटलेल्या पाउल खुणाचा अभ्यास करून पोलिसांनी चोरट्याला शोधून काढले आहे.


 विशेष म्हणजे पाउलखुणातून आरोपी उजव्या पायाने लंगडा असल्याचेही समोर आले आणि एक अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागला. 
गुरूनाथ तुकाराम वाघमारे असे आरोपीचे नाव आहे. सदर आरोपीने आपटा फाटा येथील श्री स्वामी समर्थ मंदिराची दानपेटी चोरी केली होती.


 तसेच तसेच मंदीराच्या बाजूला राहणारे मंदीराचे विश्वस्त अंजली मिलिंद मुणगेकर यांच्या घराचे मागील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करुन कपाटाचे लॉकर मध्ये ठेवलेले देवीचे वापरातील अडीच लाख रुपये किमतीचे 5 तोळे सोन्याच्या दागीन्यांची चोरी केली होती. या बाबत पनवेल तालुका पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


मंदीरातील चोरी गेलेले देवीचे दागिणे व दानपेटी भाविकांच्या आस्थेशी निगडीत असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्त व पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई यांनी गुन्हयाची संवेदनशीलता लक्षात घेवून तात्काळ सदर गुन्हा उघडकिस आणण्याचे दिले होते. तसेच मंदीरातील भाविक व लोकप्रतिनिधींनी पोलीस आयुक्त यांना विनंती केल्याने सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करणेबाबत आदेशित केले


 परंतु गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून परिमंडळ-2 चे पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील व पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांचे सूचनेनुसार सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाळदे व पथकाने सुरु केले असता तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी हा चेहऱ्याला काळा कपडा बांधून अंगावर फक्त हाफ पॅन्ट व दानपेटी घेवून जाताना दिसत होता.


 गुन्ह्याची कार्यपद्धत, घटनास्थळ, वेळ व इतर परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले असता मंदीराच्या मागील भागात चिखलात मिळालेल्या पाउलखुणा, पाउलखुणांची दिशा मिळून आल्या. आरोपी हा नदीकिनारी असलेल्या चिखलातून गेल्यामुळे आरोपीच्या डाव्या पायाच्या ठळक पाउलखुणा दिसत होत्या व उजव्या पायाचे पाउलखुणा स्पष्ट दिसत नव्हत्या. 


यावरून सदर आरोपी हा एका पायाने लंगडत चालणारा असावा व मुख्य रस्त्यावरील सीसीटीवी फुटेजमध्ये आरोपी दिसत नसल्याने तो नदी पार करून पलीकडील पेण तालुक्यातील आदीवासी पाडयांच्या दिशेने गेला असावा असा निष्कर्ष काढला. यावरून गुप्त बातमीदारामार्फत पेण तालुक्यातील आदीवासी पाडे तसेच इतर परीसरात अशा वर्णनाचा व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमाचा शोध घेतला असता


 खैरासवाडी, पोस्ट जिते, तालुका पेण, जिल्हा रायगड. येथे अशा वर्णनाचा एक इसम राहत असल्याची माहीती मिळाली. परंतु तो सध्या पेण पोलीस ठाणेच्या गुन्हयात अटक असल्याचे समजले. सदरबाबत पेण पोलीस ठाण्यातील गुन्हेगारी अभिलेख तपासता सदर इसमहा दोन दिवसापूर्वी कारागृहातून सुटल्याची माहीती मिळाली व तो एका पायाने लंगडत चालत असल्याचे पेण पोलीसांकडून कळाले यावरून सदर गुन्हा त्यानेच केला असल्याची खात्री झाल्याने


 त्याचे रहाते घराचे परीसरात सापळा लावून त्याला ताब्यात घेतले व त्याने चौकशीअंती सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.या आरोपी कडून पोलिसांनी 2 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर अटक आरोपीवर यापूर्वी मंदिरातील दानपेटी चोरीचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली असून सदर गुन्ह्यात जामिनावर सुटताच दोन दिवसांमध्ये त्याने प्रस्तुत गुन्हा केला आहे.


थोडे नवीन जरा जुने