नावडे उड्डाणपुलाची अवघ्या पाच महिन्यांत दयनीय अवस्था





पनवेल दि २० (वार्ताहर) : कळंबोली येथे साडेतीन वर्षांपूर्वी बांधलेल्या उड्डाणपुलाला सहा महिन्यांत तडे गेले होते. त्यापाठोपाठ आता पनवेल-मुंब्रा महामार्गावरील नावडे उड्डाणपुलाचीदेखील अवघ्या पाच महिन्यांत दुरुस्ती करण्याची वेळ टी अॅण्ड टी कंपनीवर आली होती. त्यामुळे नावडे पुलाच्या कामाच्या दर्जाबाबतच साशंकता निर्माण होत आहे.



राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४ कळंबोली वसाहतीच्या बाजूने जातो. या महामार्गावर अवजड वाहनांची संख्या सर्वाधिक असते. याचे कारण म्हणजे बाजूला तळोजा औद्योगिक वसाहत, लोह- पोलाद मार्केट आहे. तसेच जेएनपीटीला जाण्याकरिता याच महामार्गाचा वापर करावा लागतो. उत्तर व दक्षिणेकडून येणारी जाणारी वाहनांची वर्दळ एनएच-४ वर असते. या महामार्गाची रुंदी कमी आहेच. शिवाय बाजूला लोकवस्ती असल्याने अपघातही झाले आहेत. 


त्यामुळे नावडे येथून तळोजा औद्योगिक वसाहती जाण्याकरिता अनेकांना जीव मुठीत धरूनच रस्ता ओलांडावा लागत होता. याच कारणास्तव एमएसआरडीसीने ७० कोटी रुपये खर्च करून या पुलाची उभारणी केली होती. दोन वर्षांत हा पूल बांधणे अपेक्षित होते; परंतु कोरोनाकाळातील टाळेबंदीमुळे तीन वर्षांनंतर या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता तरी नावडे गाव व नावडे फाटा येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होईल, अशी अपेक्षा होती; पण या पुलाची अवघ्या पाच महिन्यातच डागडुजी करण्याची वेळ आली आहे.
थोडे नवीन जरा जुने