पनवेल दि.१८ (संजय कदम) : एल अँड टी मार्फत पनवेल तालुक्यातील नावडे येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत काम सुरु करण्यात येणार होते. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेली बांधकामे पाडण्यासाठी आज सिडकोचे अतिक्रमण पथक या ठिकाणी आले असता प्रथम आम्हाला पर्यायी जागा द्या व मगच हि बांधकामे पाडा असा इशारा देत महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी हे काम तात्पुरते बंद पाडले.
आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे नेते बबनदादा पाटील, सुदाम पाटील, मा.नगरसेवक अरविंद म्हात्रे, मा.नगरसेवक रवींद्र भगत, किरण दाभणे, फारुख पटेल आदींसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. नावडे गाव परिसरात १९७० पासून रस्त्याच्या दुतर्फा बांधकामे करण्यात आली आहे. सिडको या परिसरात पंतप्रधान आवास योजना विकसित करीत आहे परंतु येथील स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न अजून सोडवले गेलेले नाहीत.
त्यामध्ये प्रामुख्याने नावडे ग्रामस्थांचे साडेबारा टक्के प्लॉटचा प्रश्न असून तो सिडकोने अलॉट करावा त्याचप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा बांधण्यात आलेली घरे, गाळे, दुकाने ती न तोडता प्रथम पर्याय जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सिडको प्रशासनाकडे वारंवार करून सुद्धा या मागणीकडे दुर्लक्ष करून येथील भूमिपुत्रांना बेघर करण्याचा प्रयत्न सिडको करत आहे व याला विरोध म्हणून आज सिडकोचे अतिक्रमण विभागाचे पथक हि बांधकामे तोडण्यासाठी आले असता त्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांसह स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध करून त्यांना हि कारवाई करून दिली नाही.
कोट - स्थानिक भूमीपुत्राचा प्रश्न हा प्रलंबित असल्याने तो पहिला निकाली काढावा व त्यानंतरच सिडकोने अतिक्रमण मोहीम राबवावी. - आ.बाळाराम पाटील
भूमिपुत्रांना रस्त्यावर आणण्याचे काम शिंदे सरकार करत असून, ठाकरे सरकार सत्तेवर असताना भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्याचा काम आम्ही केले होते. सिडकोचे अतिक्रमण पथक या ठिकाणी पुन्हा आले तर आम्ही बुलडोझरच्या सामोरे जाऊ - बबनदादा पाटील (नेते, महाविकास आघाडी)
भाजप प्रणित सरकार हे फक्त गोर-गरिबांचे घरे व मंदिरे पाडण्याचे काम करत आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांना राहण्यासाठी शासनामार्फत घरे देण्यात येणार आहे. मात्र येथील स्थानिक गोर गरिबांच्या घरावर सिडको बुलडोझर चालवतोय.
Tags
पनवेल