पनवेल दि . २३ ( वार्ताहर ) :सर्वत्र दिवाळी सण आदिवासी पाडा मध्ये एका अनोख्या पध्दतीने भाऊबीज साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात आदर्श सेवा भावी संस्था द्वारे उत्साहात साजरा होत असताना भटक्या विमुक्ती जातीतील कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड जावी, या उद्देशाने आदर्श सेवा भावी संस्था तर्फे घोळवाडी खारघर मधील घोळवाडी आदिवासी पाड्यातील भगिनींना साडी, दिवाळी फराळ, अन्नधान्य तसेच लहानमोठ्यांना गोड पदार्थ भाऊबीज भेट देण्यात आली.
याप्रसंगी पनवेल महापालिका अधिकारी जितेंद्र खारघर प्रभाग मढवी, 'खारघर पोलीस स्टेशन'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे, नवी मुंबई महापालिका समाज विकास विभागाचे समाजसेवक सुंदर परदेशी, ज्येष्ठ पत्रकार विश्वरथ नायर, सामाजिक कार्यकर्ते मेघनाथ ठाकूर, मनेश पाटील, रमेश शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. खारघर शहरात 'सिडको'ने उभारलेल्या सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स तसेच होणाऱ्या कॉर्पोरेट पार्क मुळे खारघर शहराचे नाव जगभर झाले. खारघर शहरात टोलेजंग इमारती उभ्या आहेत. मात्र, खारघर पासून हाकेच्या अंतरावर असलेले आदिवासी पाडे विकासापासून दूर आहेत.
मात्र, 'आदर्श सेवा भावी संस्था ' ने घोळवाडी आदिवासी पाडा मध्ये बालवाडी सुरु करुन मुले-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची बाब खूप समाधानाची आहे, असे मनोगत व्यक्त करुन, 'आपण शिक्षणापासून दूर राहिलात. मात्र, तुमच्या मुले-मुलींना चांगले शिक्षण द्या', असा सल्ला यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी आदिवासी महिलांना दिला.'आदिवासी विकास प्रकल्प'च्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध योजनांचा लाभ घोळवाडी ग्रामस्थांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी खारघर प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भावेश ठाकूर, विलास कातकरी यांच्यासह संस्था सदस्यांनी मेहनत घेतली.
किल्ला बनविणाऱ्या विद्यार्थिनींचे कौतुक घोळवाडी आदिवासी पाडा मधील माया अशोक कातकरी, सोनम रविंद्र कातकरी, आरती मंगेश कातकरी, पूनम जयराम कातकरी, भावना अशोक कातकरी, रोहिणी वसंत कातकरी, प्रतिभा गुलाब कातकरी, निशा जीवन कातकरी, अश्विनी रोहिदास कातकरी आणि रोहिणी दीपक कातकरी आदी सहावी, सातवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी २ दिवसात २ ठिकाणी बनविलेले किल्ले पाहून मान्यवर स्तब्ध झाले. यावेळी सुंदर परदेशी, मेघनाथ ठाकूर, मनेश पाटील आणि रमेश शर्मा आदी मान्यवरांनी किल्ला बनविणाऱ्या ८ विद्यार्थिनींना दोन हजार रुपये बक्षीस देवून त्यांचे कौतुक केले.
Tags
पनवेल