पनवेल दि . १९ ( संजय कदम ) : पनवेल परिसरातील नवीन पनवेल व तालुक्यातील तारा गावाच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळ्या कारणावरून हत्त्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे . तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे पुन्हा सक्रिय झाली आहेत काय ? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
नवीन पनवेल येथे आपल्या पत्नीसह राहणारा ओमार फारूक हा त्या भागात मजुरीचे काम करायचा हा मूळचा पश्चिम बंगाल येथील रहिवाशी आहे . त्याची नवीन पनवेल से. १८ मधील सिडको गार्डनजवळ मानेवर ,गळ्यावर ,तोंडावर धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली आहे . सदर हत्या ही नवीन पनवेल भागात राहणाऱ्या पप्पू उर्फ शफिक उल अहमद याने केली असावी असा नवीन पनवेल पोलिसांचा कयास आहे .
कारण त्याची ओमार च्या पत्नीवर वाईट नजर होती ही माहिती ओमार ला समजली होती . त्यामुळे त्याचा कायमचा काटा काढण्यासाठी पप्पूनेच त्याची हत्या केली असावी असा संशय ओमारच्या पत्नीने व्यक्त केला आहे . या घटनेनंतर पप्पू फरार झाला असून त्याचा शोध खांदेश्वर पोलीस करीत आहेत . हि घटना ताजी असतानाच तारा गावाच्या हद्दीत लाल रंगाच्या ऑडी कार मध्ये मागच्या सीटखाली मृतदेह कोंबलेल्या अवस्थेत
सापडल्याने खळबळ उडाली होती . पनवेल-पेण रोडवरील तारा गावच्या हद्दीत एका लाल रंगाच्या ऑडी क्रमांक एम एच १४ जीए ९५८५ ही गाडी कागदोपत्री पुणे जिल्ह्यातील तेजस प्रकाश साळवे यांच्या मालकीची दिसत आहे. सदर गाडी तारा गावच्या हद्दीत एका फार्म हाऊस समोर गेल्या २ दिवसापासून उभी होती. या गाडीत एका पुरुषाचा मृतदेह असून त्याने अंगावर टीशर्ट, जीन्स पॅन्ट घातलेली असून पायात स्पोर्ट्स शूज होती . या संदर्भात पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना माहिती मिळताच ते आपल्या पथकासह घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी सदर मृतदेहा संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी तपास सुरु केला असता सदर मयत व्यक्ती ही संजय मारुती कार्ले ( वय ४५ ) रा. तळेगाव दाभाडे असे असून या व्यक्तीचे अनेक व्यवसाय असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे .
ही व्यक्ती विवाहित असून या हत्ये संदर्भात त्याच्या कुटूंबियाना माहिती मिळताच शनिवारी सकाळी त्यांच्या कुटूंबियांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन मृतदेहाची ओळख पटवून घेतली आहे . व इतर शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून कार्ले कुटुंबीयांनी सदर मृतदेह ताब्यात घेतला आहे . यावेळी त्या कुटुंबीयांनी दिलेल्या महत्वपूर्ण अश्या माहितीच्या आधारे पनवेल तालुका पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे .
Tags
पनवेल