पनवेल दि.०२ (वार्ताहर) : नवीन पनवेल येथील ब्राह्मण सभा संस्थेच्या 'साहित्यसाधना' समूहाच्या वतीने आवाजाची कार्यशाळा घेण्यात आली होती. नवीन पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहामध्या ही कार्यशाळा झाली. आकाशवाणी, सह्याद्री वाहिनीवर गेली ३५ वर्षे वृत्तनिवेदन करणारे आणि इलेक्ट्रॉनिक वाहिनीवरील पहिले वृत्तनिवेदक आणि 'व्हाईसगुरू' अशी ख्याती असलेले दिपक वेलणकर यांनी मार्गदर्शन केले.
आजपर्यंत ९५०० हून अधिक नवोदितांना आवाजाचे प्रशिक्षण वेलणकर यांनी दिला. आपल्या प्रदीर्घ व अनुभवसिद्ध कार्य शैलीतून आवाज कसा लावावा, जोपासावा, त्यावर संस्कार कसे करावे याबाबत सोदाहरण मार्गदर्शन केले. तसेच काही अभ्यास व सराव करून घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आवाजाला प्रवाही व दमदार बनवण्यासाठी निरनिराळे व्यायाम करावे लागतात. व्यासंगाचे वेड पांघरूण घेऊन आवाजाला सुसंस्कृत करावे लागते. यालाच शास्त्रीय भाषेत आवाज साधना शास्त्र (व्हॉईस कल्चर) असे म्हणतात. आजकाल अँकरिंग, जाहिराती, डबिंग व्हॉइसिंग, रेडिओ जॉकी, व्यक्तिमत्त्व विकास अशी क्षेत्रे तरुणांना खुणावत आहेत. कार्यक्रमासाठी शंकर आपटे, पद्मनाभ व मुग्धा भागवत यांनी मोलाचे योगदान दिले.
Tags
पनवेल