पनवेल दि. ०८ ( वार्ताहर ) : आयफोनचे वेड कोणाला नसते. मात्र हा आयफोन स्वस्तात खरेदी करण्याच्या नादात बनावट आयफोन पदरी पडल्याचा प्रकार खारघरमध्ये घडला आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
से. ३०, ओवे खारघर येथील दिगंबर जगदाळे यांना मोबाईलची आवश्यकता असल्याने ते फेसबुकवर सर्च करत होते. यावेळी त्यांनी स्वस्तात आयफोन मिळत असल्याची जाहिरात वाचली, मात्र कुरिअरसाठी दोन हजार रुपये अगोदर भरावे लागेल, असे जाहिरातदाराकडून सांगण्यात आले. त्यासाठी एक क्यूआरकोड त्यांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला. त्यानुसार दिगंबर यांनी दोन हजार रुपये पाठवत उर्वरित रक्कम फोन आल्यानंतर देतो, असे सांगितले. काही दिवसांनी कुरियर बॉयने त्यांचे कुरिअर आणून देत त्यांच्याकडून उर्वरित ३८ हजार गुगल पेद्वारे घेतले.
कुरियर रुपये बॉय गेल्यानंतर दिगंबर यांनी बॉक्स उघडला व मोबाईल चालू करून आयफोनमधील ॲप स्टोअर चालू करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते चालू झाले नाही. त्यामुळे हा ओरिजनल आयफोन नसल्याचे दिगंबर यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी संबंधितांशी संपर्क साधत मोबाइलमधील समस्येची माहिती दिली. यावेळी समोरून त्यांना समस्येचा व्हिडीओ बनवून पाठवण्यास सांगितले. मात्र त्यानंतर संबंधितांनी दिगंबर यांना टाळण्यास सुरुवात केली. आपली ४० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिगंबर यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Tags
पनवेल