नवी मुंबई : नवी मुंबई शहर नियोजनबद्ध वसवलेल्या सिडकोने करोडो किंमतीचे भूखंड विकण्याचा सपाटा लावला आहे. पालिकेने विकास आराखड्यात आरक्षित केलेल्या भूखंडाची विक्री केल्याचे चित्र असताना दुसरीकडे पालिकेच्या मालकीच्या असलेल्या करोडो रुपयांच्या भूखंडाकडे सिडको दुर्लक्ष करत आहे.
शहरात अनधिकृत बांधकामे व बेकायदा धार्मिक स्थळे वाढत असताना पालिका व सिडकोच्या दुर्लक्षामुळे सिडकोच्या भूखंडावर बेकायदा नर्सरींची हातपाय पसरी वाढतच चालल्याचे चित्र आहे. शहरातील विविध विभागात वाढणाऱ्या या बेकायदा रोपवाटिकांनी आता सिडको व पालिकेलाच आव्हान दिल्याचे चित्र असून सीवूड्समधील रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या मोंक्याच्या भूखंडावरही नर्सरीचालकांची हातपाय पसरी सुरू असताना पालिकेचे व सिडकोचे अतिक्रमण विभाग डोळ्यावर पट्टी बांधून दुर्लक्ष करत आहे. याच्यापाठीमागे अधिकाऱ्यांची की स्थानिकांची वसुली सुरू आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पारसिक हिलच्या पायथ्याशी आग्रोळी गावाजवळ असलेल्या जल उदचन केंद्राच्या भिंतीचा व मुख्य जलवाहिनीचा आधार घेत बेकायदा रोपवाटीकेवर पालिकेने कारवाई केली होती. परंतु, पावसाळ्यातील भूछत्र्यांप्रमाणे सिडकोच्या भूखंडावरील नर्सरीही कारवाईनतर पुन्हा थाटल्या जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिका व सिडकोचा अतिक्रमण विभाग करतो तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नवी मुंबईत शहरभर बेकायदा रोपवाटीकांनी सिडकोच्या व पालिकेच्या मोकळ्या जागा गिळंकृत करून फुटपाथ ताब्यात घेतले असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सिडकोने कुंपन घातलेल्या भूखंडावरही ताबा मिळवून बेकायदा रोपवाटिका स्थापल्या आहेत. सिडकोच्या करोडो रुपयांच्या मालमत्तेकडे सिडकोचा कानाडोळा होत आहे. तर बेकायदा नर्सरींनी बसथांब्यांनाही विळखा घालायला सुरवात केली आहे. सिडकोच्या मालकीच्या अंगणात, तसेच पदपथावर रोपट्यांची विक्री करण्याचा बेकायदा धंदा अधिकाऱ्यांच्या छायेत जोमात सुरू असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.