मालमत्ता कर सक्त वसुली नोटीसीबाबत पनवेल शहर जिल्हा काँग्रेस आक्रमक; आयुक्तांना दिला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा




पनवेल दि.१४(संजय कदम): पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयामार्फत व्यापारी सदनिका, गाळा धारकांना कर भरण्यासाठी नोटीसी पाठविण्यात आलेल्या आहेत. व्यापारी सदनिका, गाळा धारकांनी मालमत्ता कर न भरल्यास त्यांच्यावर जप्तीची टांगती तलवार त्यांनी ठेवलेली आहे. सदर मालमत्ता कर पूर्व लक्षी असल्या कारणाने व न्याय प्रविष्ट विषय असल्याने आपण त्यांच्यावर सक्ती करू नये अश्या मागणीचे निवेदन पनवेल शहर जिल्हा काँग्रेस तर्फे आयुक्त गणेश देशमुख यांना आज देण्यात आले आहे.



       यावेळी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष सुदाम गोकुळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली मा.नगरसेविका व महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे, प्रवक्ते शशिकांत बांदोडकर, उपाध्यक्ष सुधीर मोरे यांनी या संदर्भात आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देताना सांगितले की, महाविकास आघाडी, सामाजिक संघटना व ९५ गाव संघर्ष समिती यांनी सातत्याने निषेध मोर्चा, धरणे आंदोलने व जनजागृती करून वाढीव मालमत्ता कराबाबत विरोध दर्शविलेला होता. 


त्या अनुषंगाने आपल्या दालनात सर्व पक्षीय ठरलेल्या मिटिंग प्रमाणे हा मालमत्ता कराचा विषय मुख्यमंत्री महोदय यांच्या समवेत एक बैठक आयोजित करून तो सोडविण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार होतात तरी, मालमत्ता कराबाबत सक्तीची कारवाई आपण करू नये ही विनंती. अन्यथा पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची आपण नोंद घ्यावी तसेच या बाबत आपण सकारात्मक निर्णय घेऊन मालमत्ता धारकांना दिलासा द्याल अशी आशा बाळगतो असे निवेदनात नमूद केले आहे




थोडे नवीन जरा जुने