विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता व कौशल्य लक्षात घेऊन करिअरची निवड करताना येणाऱ्या संघर्षाला आत्मविश्वासाने सामोरे जा-





पनवेल दि २७ (वार्ताहर) : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे(महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) विभागीय कार्यालय मुंबई आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई अंतर्गत व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिर अर्थात करिअर टॉक या विभागास्तरीय कार्यशाळेचे आयोजन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह, पनवेल या ठिकाणी करण्यात आले होते .



इयत्ता १० वी च्या मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा - कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या करिअर टॉक या विभागस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन दत्तात्रय नवले उपजिल्हाधिकारी मेट्रो सेंटर पनवेल यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. सदर प्रसंगी प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई उपसंचालक मनीषा पवार, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पनवेल सिताराम मोहिते त्याचप्रमाणे या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेले समुपदेशक श्रीकांत शिनगारे, चंद्रकांत मुंडे , युवराज भोसले, दयानंद शिनगारे आणि विनोद घोरपडे तसेच प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई व पंचायत समिती पनवेल येथील विषय साधन व्यक्ती, विशेष साधन व्यक्ती, विविध शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी या कार्यशाळेसाठी उपस्थित होते. 



इयत्ता १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असणारे विविध शिक्षणक्रम व व्यवसाय यांची माहिती मिळणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्वतःच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार योग्य असा शिक्षणक्रम घेता आला तर त्यांच्या उपजत गुणांना खूप वाव मिळतो. अशा प्रकारचा संवाद प्रास्ताविकच्या माध्यमातून मनीषा पवार उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांनी उपस्थितांशी साधला. यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अंतर्गत व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग सहा.संचालक डॉ. दीपक माळी यांच्या मार्गदर्शक सुचनानुसार व राज्य समन्वयक शाम राऊत यांनी साधलेल्या समन्वयातून तसेच मा.डॉ.विलास पाटील सारथी संस्था पुणे यांनी दिलेल्या नियोजनानुसार स्वतःला ओळखा व करिअर निवडा आणि तंत्रशिक्षण शाखेतील विविध करिअर संधी यावर समुपदेशक श्रीकांत शिनगारे यांनी विस्तृत असे मार्गदर्शन केले. वाणिज्य क्षेत्रातील करिअर संधी व परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर समुपदेशक चंद्रकांत मुंढे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. यानंतर कला शाखेतील करिअर संधी या विषयावर समुपदेशक युवराज भोसले यांनी खूपच छान अशी माहिती दिली. आणि वैद्यकीय शाखेतील विविध करिअर संधी तसेच ललित कला क्षेत्रातील करिअर संधी या विषयावर समुपदेशक दयानंद शिनगारे यांनी विशेष माहिती दिली तर ताण-तणाव व्यवस्थापन व अभ्यास कौशल्य या विषयाच्या अनुषंगाने विनोद घोरपडे विषय सहाय्यक तथा समुपदेशक प्रादेशिक विद्या प्राधिक मुंबई यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर त्यांनी स्वतः तयार केलेला महाकरिअर पोर्टल विद्यार्थी लॉगिन संदर्भातील एक माहितीपूर्ण व्हिडिओ उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. जेणेकरुन इयत्ता १० वी,१२ वी नंतर करिअरची निवड करण्यास विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल.



कार्यशाळेसाठी शितल अस्वले संशोधन अधिकारी सारथी विभागीय कार्यालय मुंबई यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अशाप्रकारे विविध विषयांचा अंतर्भाव असलेल्या नियोजनुसार सदर कार्यशाळा संपन्न होत असताना उपस्थित सर्व मान्यवर, पंचायत समिती पनवेल तसेच प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचे आभार मनीषा पवार उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांनी मानले तर सूत्र संचालन विनोद घोरपडे विषय सहाय्यक तथा समुपदेशक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांनी केले.




थोडे नवीन जरा जुने