मोबाईल डिलिव्हरी न करता स्वतःकडे ठेवल्या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक: ३ लाखांचे मोबाईल केले जप्त




पनवेल दि.२१(वार्ताहर): फ्लिपकार्ट कंपनीतर्फे ग्राहकांना वितरण करण्यासाठी आलेले मोबाईल परस्पर अन्यत्र विक्री करून पैसा कमावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून ३ लाख ४१ हजार ४०६ रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे.


             निलेश सुरेश शिरसट आणि राजू छेदीलाल सेठ, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एनटेक्स ट्रान्सपोर्ट स्टेशन या कंपनीमध्ये इन हाऊस प्रशासन स्टेशन असोसिएट्स या पदावर काम करणारा निलेश सुरेश शिरसट याने डिलिव्हरीकरीता आलेल्या मोबाईल फोनपैकी ५ लाख ९ हजार २८३ रुपयांचे विविध कंपनींचे व मॉडेलचे मोबाईल फोन चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी कोण होता हे माहिती असले तरी त्याचा ठाव ठिकाणा नव्हता,



 तसेच तो घरीही सापडत नव्हता. त्यामुळे राहत्या घर परिसरात दिवस रात्र सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची पोलिसी पद्धतीने चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास अटक केली. या प्रकरणात त्याचा साथीदार राजू छेदीलाल सेठ यासदेखील अटक करण्यात आली. आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेल्लेल्या मोबाईलपैकी ३ लाख ४१ हजार ४०६ रुपये किंमतीचे विविध कंपनींचे व मॉडलचे १६ मोबाईल हँडसेट हस्तगत केलेले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर, पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.



थोडे नवीन जरा जुने