शिवा जनशक्ती पार्टीच्या गावोगावी शाखा स्थापन करा.








उरण दि 21 (विठ्ठल ममताबादे )सर्व बहुजन,ओबीसी दलित आदिवासी शेतकरी,कष्टकरी व उपेक्षीत समाजाला अपेक्षित राजकीय वाटा मिळवून देण्याच्या उद्देशाने शिवा जनशक्ती पार्टीची स्थापना झाली असून बहुजन ओबीसी, दलित आदिवासी, शेतकरी कष्टकरी व उपेक्षित समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी व प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी शिवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून जनतेला, नागरिकांना शोषित समाजाला संघटित करा. त्यांचे प्रश्न सोडवा. बहुजन, वंचित शोषित समाजाला न्याय देण्यासाठी शिवा जनशक्ती पार्टीचे शाखा गावागावात, शहराशहरात स्थापन करा असा आदेश प्रा. मनोहर धोंडे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिला.




शिवा जनशक्ती पार्टीचे निवडणूक आयोगाकडे नाव नोंदणी करण्याच्या उद्देशाने तसेच पक्षाचे राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणी निवड करण्याच्या अनुषंगाने सोमवार दि 20 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईमधील मंत्रालयासमोर असलेल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शिवा जनशक्ती पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक दुपारी 2 ते संध्याकाळी 7 या वेळेत संपन्न झाली. यावेळी शिवा जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा पक्षप्रमुख प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.





यावेळी पक्षाची ध्येय धोरणे पक्षाची उदिष्ट पक्षाचे विस्तार तसेच घटना या विषयी प्रा. मनोहर धोंडे यांनी सविस्तरपणे माहिती देऊन पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रस्थापित असलेले भाजप काँग्रेस तसेच अन्य पक्षाने सर्वसामान्य घटकांना उपेक्षित, वंचितांना योग्य तो न्याय दिला नाही.आजही वंचिताचे, उपेक्षितांचे अनेक प्रश्न दुर्लक्षितच आहेत. या प्रश्नाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले गेले.त्यामुळे सर्वसामान्यांच्या, उपेक्षितांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व प्रस्थापित पक्षांना पर्याय म्हणून शिवा जनशक्ती पक्षाची स्थापना झाली आहे. लवकरच या पक्षाची राज्य निवडणूक आयोग व केंद्रिय निवडणूक आयोगा कडे नाव नोंदणी केली जाणार आहे. पक्षाचे चिन्ह म्हणून त्रिशूल डमरू तसेच अन्य चिन्ह, स्लोगन (घोषवाक्य) म्हणून जय शिवा, हर हर महादेव तर सर्व समावेशक असे झेंडा त्यात सर्व रंग असतील असे प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे. भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका तसेच विधानसभा, लोकसभा मतदार संघाच्या निवडणूका शिवा जनशक्ती पक्ष आपल्या ताकदीवर लढेल. निवडणूक रिंगणात उतरून आपली ताकद दाखवेल असे मनोहर धोंडे सर यांनी यावेळी सांगितले.




ओबीसी बहुजन शेतकरी कष्टकरी दलित आदिवासी व दुर्लक्षित उपेक्षित घटकांना अपेक्षित न्याय मिळवण्यासाठी स्थापन झालेल्या शिवा जनशक्ती पक्षाला पहिल्याच टप्प्यात अनेक राज्यांतुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित शिवा जनशक्ती पार्टीच्या महत्वपूर्ण बैठकीला शिवा जनशक्ती पक्ष प्रमुख प्राध्यापक मनोहरजी धोंडे , कर्नाटक वीरशैव लिंगायत संघटनेचे राज्य सरचिटणीस ओंकार मुर्ती बेंगलोर, कर्नाटक वीरशैव लिंगायत संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश मुर्ती चित्रगुर्ग, नाथ समाज संघटना महाराष्ट्र अध्यक्ष बाबानाथ जाधव ठाणे, मुनेरवारलु आदीवासी समाज संघाचे महाराष्ट्र सरचिटणीस सोपानराव मारकवाड , शिवा संघटना मध्यप्रदेश राज्य प्रभारी दिलीपराव मरडवार जबलपुर, अहमदपुरचे माजी आमदार बबरूवान खंदारे यांचे चिरंजीव तथा यलम/रेड्डी समाजाचे नेते ॲड.रामभाऊ खंदारे, सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील राज्य सरकारचे वकील ॲड.महालिंग पंधरगे दिल्ली, सामाजिक कार्यकर्त्या सुनिताताई तोडकर उल्हासनगर, सामाजिक कार्यकर्त्या गीताताई चव्हाण ठाणे, सामाजिक कार्यकर्ते अशोक भांजे सोलापूर, नाभिक समाज संघटनेचे नेते अशोक गोविंदराव सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते श्रावण जंगम, करणी राजपूत सेना अध्यक्ष योगेश प्रतापसिंग आदी विविध जाती पोटजातींचे व विविध समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते, प्रतिनिधि आवर्जून उपस्थित होते. 




महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्तेही मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तसेच पक्षाचे खंदे समर्थक रुपेश होनराव यांनी उत्तमरित्या केले.सदर कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.एकंदरीत शिवा जनशक्ती पार्टीची महत्वपूर्ण बैठक मोठ्या उत्साहात व उत्तम प्रतिसादासह संपन्न झाली.शिवा जनशक्ती पार्टीला महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्रप्रदेश,तेलंगणा,मध्यप्रदेश, गुजरात व दिल्ली राज्यातुन मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असल्याचे चित्र या बैठकीतून दिसून आले.


थोडे नवीन जरा जुने