मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसेचा पनवेलमध्ये राजभाषा महोत्सव; राज ठाकरे देणार प्रकट मुलाखत






पनवेल दि.२१ (संजय कदम) : यंदाच्या मराठी राजभाषा दिनाचे (२७ फेब्रुवारी) औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पनवेलमध्ये राजभाषा महोत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त पत्रकार अमोल परचुरे हे "ठाकरे नेमकं काय वाचतात" या विषयावर राज ठाकरेंशी संवाद साधून त्यांच्या वाचनविषयीच्या आवडी-निवडीवर त्यांना बोलतं करणार आहेत. तसेच या ५ दिवसीय महोत्सवाच्या अंतर्गत गुरुवार २३ ते सोमवार २७ फेब्रुवारी दरम्यान सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत मराठी पुस्तकांचे भव्य प्रदर्शन तर दररोज सायंकाळी ६ वाजता नामवंतांच्या उपस्थितीत चर्चासत्र, काव्यमैफल, व्याख्यान, मुलाखतीची मेजवानी पनवेलमधील मराठीजनांना मिळणार आहे, अशी माहिती मनसेचे राज्य प्रवक्ते आणि पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांनी पनवेल येथे पत्रकार परिषदेत दिली.




यावेळी जिल्हा सचिव अतुल चव्हाण, उपशहर प्रमुख संजय मुरकुटे, वाहतूक सेना पनवेलचे सचिन जाधव, रस्ते आस्थापना मनसे जिल्हा सरचिटणीस किरण गुरव उपस्थित होते. यावेळी राजभाषा महोत्सवाची माहिती देताना आयोजक योगेश बिले यांनी सांगितलं की, जुन्या पनवेलमधील विरुपक्ष हॉलजवळच्या पाण्याच्या टाकीच्या मैदानात 'दि. बा. पाटील पुस्तकनगरी साकारण्यात येत आहे. गुरुवार २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते राजभाषा महोत्सवाचे तसंच मराठी पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून सायंकाळी ६ वाजता 'मराठी नाटक आणि सिनेमा : भविष्यातील 'आव्हानं या चर्चासत्रात ख्यातनाम दिग्दर्शक केदार शिंदे, अभिजित पानसे, अभिनेता पुष्कर श्रोत्री, संतोष 'जुवेकर सहभागी होणार आहेत.




 लेखक-पत्रकार नरेंद्र बंडवे आणि अजय परचुरे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. तसेच शुक्रवार २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता 'न्यूजलेस कविता' हा काव्य वाचनाचा कार्यक्रम होणार असून त्यात पत्रकार- कवी पंकज दळवी, सुरेश ठमके, भिमराव गवळी, यामिनी दळवी, प्रशांत डिंगणकर, श्वेता सोपारकर, सुनील तांबे, दीपक पाळसुले, माधव डोळे सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे शनिवार २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी इतिहास अभ्यासक श्रीनिवास पेंडसे यांचे 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जीवन चरित्र' यावर व्याख्यान होणार आहे, तर रविवार २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ख्यातनाम मराठ लेखक अच्युत गोडबोले 'ज्ञानभाषा मराठी आणि माझा लेखन प्रवास' या विषयावर अनुभवकथन करताना राजभाषा मराठी नव्या युगाची ज्ञानभाषा होऊ शकेल का, याबाबत भाष्य करणार आहेत. सोमवारी २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी महाराष्ट्राची लोकधारा आणि प्रतिभावंतांचा सत्कार आयोजित केल्या माहिती राजभाषा महोत्सवाचे आयोजक, मनसेचे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांनी दिली.



 तर राजभाषा महोत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मराठी राजभाषा दिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ही मुलाखत होणार आहे. पत्रकार अमोल परचुरे हे "ठाकरे नेमकं काय वाचतात" या विषयावर राज ठाकरेंशी संवाद साधून त्यांच्या वाचनविषयीच्या आवडी-निवडीवर त्यांना बोलतं करणार आहेत. "मराठी वाचन संस्कृतीला प्रचार प्रसार व्हावा आणि मराठी पुस्तकांच्या विक्रीला चालना मिळावी यासाठी "ठाकरे नेमकं काय वाचतात" या मुलाखतीचं आयोजन केल्याचं योगेश चिले यांनी सांगितलं.



थोडे नवीन जरा जुने