आग्रा किल्ल्यात यंदा प्रथमच साजरी होणार शिवजयंती.






उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )मराठेशाहीच्या इतिहासात मोठे महत्व असलेल्या आग्राच्या किल्ल्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी दिल्याबद्दल भारतीय जनता पाटीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव विक्रांत पाटील यांनी आज (दि. 17)रोजी भागुबाई चांगू ठाकूर विद्यालय, द्रोणागिरी,उरण येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रातील मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे. हा उत्सव साजरा व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील यांनी आभार मानले आहेत.




या पत्रकार परिषदेला आमदार महेश बालदी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील,राज्य महासचिव विक्रांत पाटील, रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस दिपक बेहेरे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की मराठेशाहीच्या इतिहासात आग्रा येथील किल्ल्याला मोठे महत्व आहे.श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यातील दिवाण-ए- आम मध्ये औरंगजेबासमोर बाणेदारपणाचे दर्शन घडवले होते. हा 'दिवाण-ए-आम' यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने निनादणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती यावर्षी साजरी होत आहे. या निमित्ताने हा मोठा योग महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. हिंदवी स्वराज्याचे मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांचा जयंती उत्सव आग्रा किल्ल्यात साजरा होणे हा समस्त मराठी जनतेच्या दृष्टीने अभिमानाचा क्षण आहे.





आग्रा किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्याची मागणी काही सामाजिक संस्थांनी केंद्र शासनाकडे केली होती, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यास नकार दिला होता. त्याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. या कार्यक्रमाचा महाराष्ट्र शासन सहआयोजक असेल तर या किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभाग आणि पुरातत्व सर्वेक्षण विभागाला पत्र लिहून महाराष्ट्र शासन काही सामाजिक संस्थाच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करणार असल्याचे कळविले. त्यानुसार पुरातत्व विभागाने महाराष्ट्र शासनाला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची अनुमती दिली आहे असेही त्यांनी सांगितले.




या शिवजयंती उत्सवाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या पुणे येथील शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. अशी माहितीही जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.यावेळी विक्रांत पाटील यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे स्वरूप काय असेल याविषयी पत्रकारांना माहिती दिली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विविध शिवप्रेमींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असणार आहे. असे सांगत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावरहि महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून या शिवजयंतीला शिवप्रेमी, विविध सामाजिक संस्था, संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विक्रांत पाटील यांनी यावेळी केले.


थोडे नवीन जरा जुने