पनवेल दि. २५ (संजय कदम) : मराठी माणूस नाट्यवेडा आहे. इतर रंगभूमींवर नाटक हे फक्त रंजन किंवा वेळ घालवायचं साधन म्हणून पाहिलं जातं पण मराठी प्रेक्षक नाटक ही पर्वणी म्हणून पाहायला जातो. पोटाला चिमटा काढतील, पदरमोड करतील पण मराठी नाटकं गांभीर्याने पाहतील असे मत प्रसिध्द मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी व्यक्त केले. ते पनवेल शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित राजभाषा महोत्सव अंतर्गत मराठी नाटक व सिनेमा भविष्यातील आव्हानं यावरील चर्चासत्रात बोलत होते. या चर्चासत्रात प्रसिद्ध दिग्दर्शक अभिजित पानसे, केदार शिंदे, अभिनेते पुष्कर श्रोत्री, संतोष जुवेकर यांनीही सहभाग घेतला
पनवेल शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राजभाषा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. २२ ते २७ फेब्रुवारी असे पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवातील दि. बा. पाटील पुस्तकनगरी या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. विरुपाक्ष सभागृहाशेजारील मैदानात हे प्रदर्शन नागरिकांसाठी भरवण्यात आले आहे. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष योगेश चिले, केसरीनाथ पाटील, रामदास पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या राजभाषा महोत्सवात व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद, काव्य मैफल विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारी राज ठाकरे यांची मुलाखतीचा कार्यक्रम पनवेल शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडणार आहे. राज ठाकरे हे काय वाचतात या विषयावर ही मुलाखत घेतली जाणार आहे.
Tags
पनवेल