टेबल टेनिस पटू स्वस्तिका घोषची चमकदार कामगिरी; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन


पनवेल(प्रतिनिधी) टेबल टेनिस पटू स्वस्तिका संदीप घोष हिने जम्मू येथे झालेल्या इंटर स्टेट सिनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेतील दुहेरी गटात रजत पदक मिळवत पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर २०२४ मध्ये पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या अनुषंगाने जपान देशात प्रशिक्षण घेण्यासाठी स्वस्तिकाची निवड झाली आहे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिका घोषचे अभिनंदन करून तिला पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.          जागतिक दर्जाच्या खेळाडूंची असलेली ऑलिम्पिक स्पर्धा दर चार वर्षांनी होत असते. आगामी ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस देशात होणार आहे. पूर्वी या स्पर्धेत एखाद दुसरे पदक आपल्या देशाला प्राप्त व्हायचा. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा विभागाला बळ देण्याचे काम केले आणि ऑलम्पिक मध्ये भारताने कामगिरीचा आलेख उंचविला. तसेच 'खेलो इंडिया युथ गेम' उपक्रमातून देशातील प्रतिभावंत खेळाडू उदयास आले. त्याचप्रमाणे स्वस्तिका घोष ने सुद्धा 'खेलो इंडिया युथ गेम' या टेबल टेनिस राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी केली होती. स्वस्तिकाने प्राथमिक शिक्षणापासूनच टेबल टेनिस मध्ये सहभाग घेतला असून सातत्याने सराव आणि त्या अनुषंगाने मेहनत घेतली, त्यामुळे तिने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने दैदिप्यमान कामगिरी केली आहे.          जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमध्ये स्वस्तिकाने इयत्ता तिसरी ते बारावी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर आता ती खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात (स्वायत्त) बीएमएसचे शिक्षण घेत आहे. स्वस्तिकाने देशात व परदेशात झालेल्या टेबलटेनिस स्पर्धेत चमकदारी कामगिरी करीत देशाचे नाव उंचाविले आहे. हॉंगकॉंग, स्पेन, जॉर्डन, कोलंबो, फ्रांस यांसह इतर देशामध्ये झालेल्या स्पर्धेत स्वस्तिकाने अजिंक्यपद पटकाविले आहे. स्वस्तिकाने लहानपणापासून टेबलटेनिस खेळात आपली आवड व नैपुण्य दाखविले आहे. त्यामुळे तीला 'विराट कोहली फाऊंडेशन' कडून स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे. ती भारतातील एकमेव टेबल टेनिस खेळाडू आहे, जी या संस्थेद्वारे स्कॉलरशिपसाठी निवडली गेली आहे. स्वास्तिकाचे वडील संदीप घोष हे या खेळातील प्रशिक्षक आणि सल्लागार आहेत. मिशन ऑलिम्पिक २०२४ अनुषंगाने भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर स्पोर्ट्सच्या वतीने स्वस्तिकाला जागतिक दर्जाचा सराव आणि पूर्व तयारी करण्यासाठी जपान देशात सुप्रसिद्ध प्रशिक्षक कुई जियान जीन यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यासाठी केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाकडून तिला या प्रशिक्षणासाठी आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे. स्वस्तिका नेहमीच चांगली कामगिरी करत आहे, यापुढेही तीची झेप उंचावतच रहावी, अशा शब्दात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. 


थोडे नवीन जरा जुने