कारवाईची मागणी पनवेल दि.०८ (वार्ताहर) : पनवेल महानगर क्षेत्रातील खारघरमधील फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय फेरवाल्यांवर पनवेल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा वरदहस्त असल्यामुळे कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यामुळे आयुक्त गणेश देशमुख यांनी या विभागाची पाहणी करून या फेरीवाल्यावर जबर बसवावा अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खारघर शहराध्यक्ष गुरूनाथ पाटील यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत गुरूनाथ पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पनवेल महानगरपालिका क्षेत्र खारघर शहरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी मार्केट परिसरातील जागा उपलब्ध करून दिली असताना देखील खारघर शहरातील रस्त्याच्या बाजुला असलेल्या फुटपाथसारख्या मोक्याच्या जागी मोठया प्रमाणात फेरीवाले आपला व्यवसाय थाटून बसलेले दिसून येतात. वर्दळीच्या वेळी फेरीवाल्यांमार्फत फुटपाथ अडविल्यामुळे नागरीकांना प्रवास करताना देखील त्रासाचे होत आहे. तसेच आम्हांला मिळालेल्या माहितीनुसार असे समजले आहे की, सदरच्या फुटपाथवर मराठी लोक देखील आपला व्यवसाय करीत असताना आपल्या मराठी लोकांवर पनवेल महानगरपालिकेमार्फत कारवाई होवून त्याचा व्यवसाय बंद केला जात आहे.
तसेच त्यांच्याकडून हप्ता देखील वसूल करतात. आपला व्यवसाय सुरू होण्यासाठी मराठी फेरीवाले गप्प बसून राहतात. मात्र परप्रांतीय फेरीवाले रात्री २ ते ३ वाजेपर्यंत आपला धंदा करीत असताना देखील त्यांच्यावर मात्र महानगरपालिकेमार्फत कोणत्याही प्रकारची व कसलीही कारवाई कधीच केली जात नाही. कारण परप्रांतीय फेरीवाल्यांवर महापालिका कर्मचाऱ्यांची मेहरबानी असून त्यांचा व्यवसाय राजरोसपणे चालू असतो. याआधी देखील आपल्या कार्यालयाकडे पत्र व्यवहार करून देखील सदरच्या फेरीवाल्यांवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तरी आपण आपल्या स्तरावर योग्य पहाणी करून योग्य कारवाई करावी अशी मागणी गुरुनाथ पाटील यांनी केली आहे. या मागणीची प्रत त्यांनी राज्याचे गृहमंत्री, नवी मुंबई पोलीस आयुक्त, पनवेल महापालिका विभागीय अधिकारी यांना दिली आहे.
Tags
पनवेल