भरधाव स्कुटीचे चाक निखळुन पान टपरी चालकाचा मृत्यू





पनवेल दि.०३ (वार्ताहर): कळंबोली येथे जाणाऱया पान टपरी चालकाच्या स्कुटीचे पाठीमागील चाक निखळल्याने सदर पान टपरी चालक रस्ता दुभाजकावर धडकुन त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघाताला मृत पान टपरी चालक जबाबदार असल्याचे आढळुन आल्याने कामोठे पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.



या घटनेतील मृत भिमसेन उदयलाल चौरसिया (35) हा कळंबोली सेक्टर-6 मध्ये राहण्यास असून त्याची उरणच्या जासई भागात पान टपरी आहे. आपल्या पान टपरीवर जाण्यासाठी तो दरदिवशी आपल्या भावाची स्कुटी वापरत होता. भिमसेन हा नेहमीप्रमाणे जासई येथील पान टपरीवर गेला होता. त्यानंतर रात्रीच्या सुमारास तो पान टपरी बंद करुन स्कुटीवरुन जेएनपीटी कळंबोली मार्गावरुन आपल्या घरी परतत होता. त्याची स्कुटी खांदा गाव येथील रेल्वे ब्रिज उतरत असताना, त्याच्या स्कुटीचे पाठीमागील टायर चालत्या गाडीमधुन निघुन त्याची स्कुटी स्लीप झाली. 



 त्यामुळे भिमसेन हा स्कुटीवरुन खाली पडून त्याचे डोके सिमेंटच्या रस्ता दुभाजकावर आपटले गेले. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला कामोठे येथील एमजीएम हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघातात मृत भिमसेन याने भरधाव वेगात स्कुटी चालवुन नेत असताना, त्याच्या स्कुटीचे चाक निखळुन तो स्वत: रस्ता दुभाजकावर धडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे कामोठे पोलिसांनी या अपघाताला जबाबदार धरुन मृत भिमसेन विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


थोडे नवीन जरा जुने