लेबरला मारहाण करुन पसार झालेल्या त्रिकुटाला पनवेल तालुका पोलिसांनी ७२ तासांत केले गजाआड






पनवेल दि. ३० (संजय कदम): पनवेल तालुक्यातील बारदोली येथे एका ५४ वर्षीय इसमाला दगडाने मारहाण करून त्याला लोखंडी पलंगाला बांधून ठेवल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तीन अनोळखी इसमांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शिताफीने कारवाई करत या गुन्ह्यातील तीन आरोपींना उत्तरप्रदेश मधील कानपूर येथून अटक केली आहे.


     राम गोपाळ पाटील हे वाधवा बाईस सिटी, लेबरकॉलनी वारदोली येथे भाजी विक्री करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना अज्ञात कारणावरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लेबरकॉलनी मधील तीन अनोळखी इसमांनी दगडाने डोक्यात मारहाण केली व खाली पाहून हातापायाने छातीवर व शरीरावर मारहाण करून डोक्यात गंभीर दुखापत व बरगड्यास फ्रैक्चर केले. त्यानंतर राम पाटील यांना पत्र्याच्या शेडमधील रूम नंबर चार मध्ये लोखंडी पलंगाला बांधून ठेवले. यात राम गोपाळ पाटील हे जखमी झाल्याचे त्याचे नातेवाइक भूषण पाटील यांनी पहाताच तातडीने त्यांनी पनवेल तालुका पोलिसांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्वरीत घटनास्थळी तालुका पोलिसांचे पथक रवाना झाले. गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेउन त्यांनी याबाबतची माहिती वरीष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांना दिली. 


त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय गळवे, पोलिस हवलदार सुनील कुदळे, महेश घुमाळ, प्रकाश मेहेर, पोलिस शिपाई आकाश भगत आर्दीच्या पथकाने त्या पारिसरात चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी काही कामगार वर्ग त्या घटनेनंतर पसार झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार गुप्त बातमीदार व तांत्रीक तपासाच्या आधारे सदर आरोपींचा शोध सुरु केला असता आरोपी अभिनेंन्द्र रुद्रपाल सिंह (वय २५), सुरज जयनाथ शर्मा (वय २३) आणि बिमल कुशेर सिंग (वय २५) हे कानपूर, उत्तरप्रदेश या ठिकाणी लपल्याचे समजले त्यानुसार या पथकाने त्वरीत त्याठिकाणी सापळा रचून या तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान राम गोपाळ पाटील यांची प्रकृती सध्या गंभीर असून त्यांच्यावर अष्टविनायक हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.



थोडे नवीन जरा जुने