महाड तालुक्यात पाणीटंचाई





महाड तालुक्यातील महापुरात बाधित झालेल्या पाणी योजना आजही तशाच निधीच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. २२ जुलै २०२१ रोजी महाडमध्ये आलेल्या महापुरात तालुक्यातील शासकीय मालमत्तेबरोबर गावागावातील नळपाणी पुरवठा योजनादेखील बाधित झाल्या होत्या. अनेक गावांतील पाणी योजना पुराच्या पाण्यात वाहूनदेखील गेल्या; तर विहिरी कोसळण्याच्या घटनादेखील घडल्या. 


या पाणीपुरवठा योजना, पाण्याचे उद्भव, स्त्रोत आदीच्या दुरुस्तीसाठी स्थानिक प्रशासनाला निधीची गरज आहे, मात्र अद्याप या योजनांना दमडीदेखील मिळालेली नसल्याने ऐन टंचाई काळात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. महाड तालुक्यात दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टी होऊन महापूर आला. बहुतांश पाणीपुरवठा योजना या नदीकिनारी असल्याने नदीच्या पुराच्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात जलवाहिन्या उखडून गेल्या, तर काही ठिकाणी पडझड होऊन नुकसान झाले आहे. 




महाडमध्ये जवळपास ७२ नळ पाणीपुरवठा योजना, तर १४ विहिरी आणि २ तलावांचे नुकसान झाल्याचा अहवाल महाड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने वरिष्ठ कार्यालयाला सादर केला आहे. या पाणीपुरवठा योजनांसाठी महाड पाणीपुरवठा विभागाकडून प्रस्ताव सादर केला आहे, मात्र या बाधित योजनांना आता निधीची प्रतीक्षा आहे. या संपूर्ण दुरुस्तीसाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला तब्बल पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांची गरज असल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. मात्र महापुरानंतर जवळपास आठ महिने झाले, तरी अतिवृष्टीत बाधित झालेल्या पाणीयोजनांना निधी मिळाला नसल्याने ऐन तडाक्याच्या उन्हाळ्यात उद्भवलेल्या पाणी टंचाई काळात नागरिकांची बिकट अवस्था निर्माण झाली आहे. महाड तालुक्यात सद्य स्थितीत ग्रामीण आणि डोंगराळ भागात १७ ग्रामपंचायती आणि 30 वाड्यांना पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे..

.
थोडे नवीन जरा जुने