पनवेल महानगरपालिकेच्या जाचक करप्रणाली विरोधात महाविकास आघाडीचा जनआक्रोश महामोर्चा




पनवेल दि. १२ (संजय कदम) : पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या वाढीव जीझिया करप्रणालीचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. पनवेल महानगरपालिकेला धडा शिकविण्यासाठी महाविकास आघाडीने हजारोंच्या संख्येने महापालिकेवर आज जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला. 


 शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पनवेल-उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्कप्रमुख बबनदादा पाटील व मा आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या महामोर्चामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, ऍड सुरेश ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील, सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू, मा.नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, काँग्रेस नेते आर सी घरत, मा विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे, खारघर फोरमच्या अध्यक्षा व मा नगरसेविका लीना गरड, सतीश पाटील, दीपक घरत, शशिकांत डोंगरे, एकनाथ म्हात्रे, विश्वास पेटकर, योगेश तांडेल, शिवदास कांबळे, शशिकांत बांदोडकर, कॅप्टन कलावत, नारायण घरत, काशिनाथ पाटील, फारुख पटेल, मल्लिनाथ गायकवाड, मा नगरसेवक गणेश कडू, रवींद्र भगत, महादेव वाघमारे, महिला आघाडीच्या अनुराधा ठोकळ, वैभव पाटील, मा नगरसेवक सुनील बहिरा यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, सामाजिक संस्था, व्यापारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते



. या मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यापासून सुरुवात करण्यात आली. यानंतर कर्नाळा सर्कल येथून बाजारपेठेमार्गे पनवेल महानगरपालिकेच्या समोरील मैदानात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन जाचक मालमत्ता कर विरोधातील मागण्याचे निवेदन दिले. त्यानंतर सभेला मार्गदर्शन करताना पनवेल-उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी सांगितले कि, पनवेल महानगरपालिकेकडून सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी लादलेला जाचक करा विरोधात पनवेल महाविकास आघाडी व ९५ गाव संघर्ष समिती व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत. सदर लादलेला कर हा सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडणारा जाचक कर आहे. याबाबत राज्यसरकाने योग्य विचार करून वाढीव मालमत्ता कर माफी व दरात कपात करावी यासाठी त्यांनी बैठक लावावी अन्यथा याच्यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला


. तर मा आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले कि, सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी संख्याबळावर पनवेलच्या नागरिकांनावर मालमत्ता कर लादला आहे. सदर मालमत्ता कराला महाविकास आघाडीने सिडको वसाहतीतील नागरिक व नव्याने महानगरपालिकेत समाविष्ट केलेली गावे यांच्यासोबत रस्त्यावर येवून विरोध दर्शविला, सभागृहात देखील मी यावर विरोध दर्शवला असल्याचे सांगितले. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी आमच्या मागण्या मान्य न झाल्यास प्रत्येक भाजप नगरसेवकाच्या घरावर मोर्चा काढून त्यांना जाब विचारणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील व सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू यांनी आपल्या भाषणात भाजप प्रणित महापालिका व आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर ताशेरे ओढत हा कर रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा दिला.



 तर खारघर फोरमच्या अध्यक्षा व मा नगरसेविका लीना गरड यांनी सुद्धा आपल्या भाषणात सांगितले की, मी खारघर फोरमच्या माध्यमातून न्यायालयीन लढाई लढत असून हा कर कोणत्याही परिस्थितीत आपण रद्द करून घेऊन तुम्ही सर्वांनी फक्त आमच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन केले. या मोर्चामध्ये माताभगिनी सुद्धा भर उन्हात मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मोर्चादरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.  

   

थोडे नवीन जरा जुने