अंतर्मनातील भावनांतून साहित्याची निर्मिती डॉ.गणेश मुळे





कोमसाप नवीन पनवेल शाखेचे पोपटी कवी संमेलन संपन्न
पनवेल (वार्ताहर) - अंतर्मनातील भावनांतून साहित्याची निर्मिती होते असे मत महाराष्ट्र शासनाच्या माहिती संचालनालयाचे कोकण विभागाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्यावतीने आयोजित केलेल्या पोपटी कवी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.


    या कवी संमेलनास कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख,रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील, कोमसाप मुरुड शाखेचे अध्यक्ष संजय गुंजाळ, कोमसाप कर्जत शाखेचे अध्यक्ष अ‍ॅड. गोपाळ शेळके,मराठी भाषा मंडळ अधिकारी गजानन म्हात्रे,सुकापुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच दत्ताशेठ भगत, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी व सामाजिक कार्यकर्ते विलास भगत उपस्थित होते.


     यापुढे बोलताना डॉ. गणेश मुळे म्हणाले, मनातील भावना व्यक्त केल्या तर त्यातून नव साहित्याची निर्मिती होऊ शकते.आज दुहेरी संवाद साधण्याची पद्धत नव्या माध्यमांमध्ये आली आहे. नवनवीन माध्यमांचे आव्हान आपल्यासमोर येत आहेत. समाजामध्ये जोपर्यंत वाचणारा वर्ग आहे तोपर्यंत निश्चितच पुस्तके,वृत्तपत्र आणि साहित्य टिकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांची भाषणे झाली.


        गेली वीस वर्ष रायगडभूषण प्रा. एल.बी.पाटील व कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांच्या पुढाकाराने ही पोपटी कवी संमेलने होत आहेत.पनवेलच्या विशेषता: ग्रामीण भागामध्ये शेततळ्यामध्ये रायगडच्या मातीतील पोपटी, ही पोपटी खाता-खाता कविता म्हणायच्या,अशा या पोपटी कवी संमेलनामध्ये पनवेल,नवी मुंबई, रायगड परिसरात परिसरातील असंख्य कवी सहभागी होतात आणि मग कवी आणि कवितांचा फड रंगतो, आणि कवी संमेलन संपवू नये असेच वाटते.


    या कवी संमेलनामध्ये ज्योत्स्ना राजपूत, स्मिता गांधी, अमोल म्हात्रे, रामदास गायधने, मिलिंद खारपाटील, गुणवंत पाटील, चित्रलेखा जाधव, जनार्दन सताने, मारुती बागडे, प्रा.जयेश शिंदे, प्रा अजिनाथ गाडेकर, शैलेश कोंडस्कर, प्रतिभा मंडले आदींनी वेगवेगळ्या विषयांवरती आपल्या कविता सादर केल्या.व्यासपीठावरील मान्यवरांनाही मोह आवरता आला नाही त्यांनीही आपल्या कविता सादर केल्या.


           कवी संमेलनाचे प्रास्ताविक कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पदवी शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी, या कवी संमेलनाला अनेक वर्षांची परंपरा आहे.पोपटी कवी संमेलनातून नवोदित साहित्यिक निर्माण होत असल्याचे सांगितले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन योगिनी वैदू यांनी केले.


थोडे नवीन जरा जुने