भारतीय मजदूर संघाची उग्र निदर्शने





उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )केंद्र सरकार व जे. एन.पी. ए. व्यवस्थापनाच्या कामगार विरोधी धोरणां विरोधात भारतीय मजदूर संघ व जेएनपीटी जनरल कामगार संघटना तसेच जेएनपीटी वर्कर्स युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने जे. एन. पी. ए. प्रशासन भवनासमोर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी दि. 17 मार्च 2023 रोजी उग्र निदर्शने करण्यात आली. 


जे. एन .पी. ए. हॉस्पीटलचे खाजगीकरण रद्द करावे, कंत्राटी कामगारांना ग्रॅज्यूईटी व आरोग्य विमा मिळावा, कामगारांचे निवृतीचे वय 60 वर्षे करावे, निवृत्त कामगारांच्या वारसांना नोकरी दयावी, वेतन कराराची थकबाकी ताबडतोब घेण्यात यावी. या व इतर मागण्यांसंदर्भात ही निदर्शने करण्यात आली.जे. एन.पी. ए सुशोभिकरणाच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करीत आहे. परंतु त्याची निगा राखणाऱ्या कंत्राटी कामगारांना वेतन करार होऊन 8 महिने झाल्यावर सु‌द्धा 32 महिन्यांची थकबाकी देण्यासाठी फाईलवर सही होत नाही.अधिकाऱ्यांच्या हाताला लकवा मारलाय का ? असा सवाल कामगार नेते भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर घरत यांनी आपल्या भाषणातून उपस्थित केला. हजारो कोटींची रॉयल्टी वर्षाला जमा होते परंतु थकबाकी देण्यास टाळाटाळ हा निव्वळ मुजोरपणा आहे हा माज कसा उतरवायचा याची आम्हाला चांगली जाण आहे असे सुधीर घरत यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले.



यावेळी भारतीय पोर्ट अँण्ड डॉक मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील,जे.एन.पी. ए. कामगार विश्वस्त रवींद्र‌ ‌पाटील, जनार्दन बंडा , एल. जी. म्हात्रे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले . यावेळी युनियनचे अध्यक्ष प्रमोद पाटील,मंगेश ठाकूर,श्री ठाकरे यांच्यासह भारतीय मजदूर संघ, जेएनपीटी जनरल कामगार संघटना, जेएनपीटी वर्कर्स युनियनचे पदाधिकारी सदस्य, कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिष्ट‌मंडळाने जे.एन. पी. ए. चे मुख्य व्यवस्थापक जयंत ढवळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व चर्चा केली. यावेळी श्री.ढवळे यांनी वेतन कराराची थकीत रक्कम येत्या 15 दिवसाच्या आत देण्याचे मान्य केले.





थोडे नवीन जरा जुने