पनवेल दि.१९ (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य पोलीस दल अधिक अलर्ट आणि सक्षम झालेले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेबरोबरच गुन्हे प्रगटीकरण करून गुन्हेगारीला आळा बसवण्याचे प्रथम कर्तव्य खाकी वर्दीला बजावावे लागते. सखोल तपास, तांत्रिक दुवे तसेच माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कशा पद्धतीने गुन्हे अन्वेषण करायचे याकरीता राज्यभरातील पोलिसांना गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय नाशिक येथे दोन आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाते. नुकत्याच पार पडलेल्या या कार्यशाळेमध्ये नवी मुंबई पोलिसांनी छाप पाडली. या निमित्ताने घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत पहिले तीनही क्रमांक पोलीस आयुक्तालयातील अमलदारांनी पटकावले. प्रशिक्षण विद्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
राज्य पोलीस दल आधीच सक्षम त्याचबरोबर कार्यक्षम करण्याच्या अनुषंगाने गृह विभागाने पावले उचलले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणे तसेच अंतर्गत शांतता राखणे त्याचबरोबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे याचे मोठे आव्हान खाकी वर्दी समोर असते. अनेक ठिकाणी, खून, दरोडे, महिला अत्याचार, घरफोड्या, सोनसाखळी चोरी, बतावणी करून लूट, त्याचबरोबर फसवणूक आणि सायबर संदर्भातील ही गुन्हे मोठ्या प्रमाणात घडतात. गुन्हा घडल्यानंतर त्याचे प्रगटीकरण व अन्वेषण करण्याची मुख्य जबाबदारी त्या त्या पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर असते. तपास अधिकाऱ्याला अंमलदाराकडून साह्य केले जाते. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने तपास केला जातो. गोपनीय माहिती बरोबरच इतर अनेक पद्धतीचा अवलंब करता येतो. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात गुन्हेगारांना अधिक जलद ट्रॅप करता येऊ शकते.
दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये बदल होत आहे. अत्याधुनिक स्वरूपाची साधने उपलब्ध होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस खात्यातील प्रत्येक अंमलदार गुन्हे अन्वेषणामध्ये अपडेट असणे आवश्यक आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना कायद्याबरोबरच तांत्रिक तपासाची ही इत्यंभुत माहिती असणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक येथील गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयात दहा वर्षापेक्षा जास्त सेवा बजावलेल्या अंमलदारांना प्रशिक्षण दिले जाते. 6 ते 18 मार्च या कालावधीत अशा प्रकारची कार्यशाळा संपन्न झाली
यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील निवडक अमलदारांना या ठिकाणी पाठवण्यात आले होते. नवी मुंबईतून पोलीस आयुक्तालयातून सुद्धा या प्रशिक्षणाला पोलीस कर्मचारी गेले होते. यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या अंमलदारांनी यावेळी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेमध्ये बाजी मारली. समाजसेवा शाखेमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या सविता म्हात्रे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अल्पेश पाटील आणि खांदेश्वर येथे नेमणुकीस असलेल्या चेतन घोरपडे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य अशोक नखाते, उपप्राचार्य जॉर्ज फर्नांडिस आणि सत्र संचालक राजेंद्र उशिरे यांच्या हस्ते गुणवंत अमलदारांना सन्मानित करण्यात आले.
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पदभार घेतल्यानंतर नवी मुंबई पोलीस दलामधील कौशल्य, कार्यतत्परता आणि कर्तव्यदक्षता अधिक उजाळून निघाल्याचे एकंदरीत यावरून दिसत आहे.
चौकट - वाहतूक नियमानामध्येही नवी मुंबईत पहिले!
गुन्हे अन्वेषणाबरोबरच वाहतूक व्यवस्थापनाचेही या कालावधीमध्ये प्रशिक्षण संपन्न झाले. नवी मुंबई पोलिस दलातून अंमलदारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत वाहतूक शाखेचे चंद्रशेखर प्रकाशराव वाघ यांनी प्रथम क्रमांक मिळवून नवी मुंबई पोलिसांची मान उंचवली.
Tags
पनवेल