वयोवृध्द महिलांचा पाठलाग करून चैन स्नॅचिंग करणारा ओला चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात;








वयोवृध्द महिलांचा पाठलाग करून चैन स्नॅचिंग करणारा ओला चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात; २,५१,१४८ रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त
पनवेल दि.१८(संजय कदम): वयोवृध्द महिलांचा पाठलाग करून चैन जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास मुंब्रा पोलीसांनी अटक करून त्याच्या कडून  २,५१,१४८ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.



         मुंब्रा पोलीस ठाणे हददीतील दिवा शहर परिसरात वयोवृध्द महिलांना टार्गेट करून त्यांचा पाठलाग करून सदर महिला राहत्या इमारतीमध्ये जिन्याने घरी जात असताना अनोळखी आरोपी हा त्यांच्या गळयातील सोन्याचे दागिने जबरीने खेचून पळून जात होता. अशाप्रकारचे १० ते १२ दिवसांमध्ये ४ चोरीच्या घटना घडल्याने सदर गुन्हेगारास अटक करून चैन स्नॅचिंग गुन्हयांना प्रतिबंध करणे व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान मुंब्रा पोलीसांसमोर होते. वयस्कर महिलांना टार्गेट करून त्यांचे दागिने चोरी होत असल्यामुळे जनमानसामध्ये गुन्हेगारास पकडून घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याची मागणी होत होती. 



त्यानुसार मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांनी गुन्हयांच्या घटनास्थळी भेट देवून सदर गुन्हे उघडकीस आणण्याकरीता मुंब्रा व दिवा गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि शेळके, बोरसे व अमंलदार यांची दोन पथके तयार करून गुन्हेगाराची गुन्हे करण्याची पध्दत, गुन्हे करण्यासाठी वापरलेले वाहन तसेच इतर तांत्रिक व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपी निष्पन्न करून त्यास अटक करणेबाबत वेळोवेळी मार्गदर्शन व पाठपुरावा केला. सदर पथकांनी ४ चैन जबरी चोरीचे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याकरिता अविरत परिश्रम करून दिवा, खर्डीगाव, मुंब्रा व शिळफाटा परिसरातील सुमारे ११० खाजगी व महानगरपालिकेचे सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांचे फुटेज संकलन केले. सदर सी.सी.टी.व्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण करून आरोपीने गुन्हयात वापरलेली मोटारसायकल व त्याचा जाण्या-येण्याचा मार्ग निष्पन्न केला.



 सदरचा आरोपी हा गुन्हे करून खर्डी गाव परीसरात जात असल्याचे आढळून आल्याने नमुद पथकांनी अहोरात्र सापळा लावून आरोपीस निर्मलनगरी खर्डी गाव येथून शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले. कमलेश रामानंद गुप्ता (वय ३३ वर्षे) असून तो एक ओला चालक आहे. त्याला पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामध्ये त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयातील चैन जबरी चोरीचे ४ गुन्हे व चोरीचे २ गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून, गुन्ह्यातील १,९१,१४८ रुपये किंमतींचा ६१ ग्रॅम सोन्याचे दागिने व जबरी चोरीचे गुन्हे करण्याकरीता त्याने नौपाडा हददीतून चोरी केलेली ६०,०००/- रु. किंमतीची मोटार सायकल असा एकुण २,५१,१४८ रु किंमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी कोल्हटकर, पोलीस निरीक्षक संजय पवार, बाबासाहेब निकम, सहायक पोलीस निरीक्षक शहाजी शेळके, कृपाली बोरसे, संतोष उगलमुगले, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र किंगरे पोलीस अमंलदार सुभाष मोरे, जयेश तामोरे, योगेश पाटील, किशोर वैरागकर, निलेश लोंढे, प्रमोद शिंदे, उमाकांत गायकवाड, प्रमोद जमदाडे व अजीत येळे यांनी केली आहे. पुढील तपास सपोनि शेळके करत आहेत.



थोडे नवीन जरा जुने